पान:माझ्या शेतकरी भावांनो आणि मायबहिणींनो... (Mazya Shetkari Bhavanno Mayabhaininno...).pdf/२९८

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.


औरंगाबाद ज्ञानयज्ञायी फलनिष्पत्ती


  नोव्हेंबरपासून चाललेल्या, शेतकरी संघटनेच्या तीन दिवसांच्या अधिवेशनातील या समारोपाच्या खुल्या अधिवेशनाच्या व्यासपीठावरून बोलण्यासाठी उभे राहताना माझ्या मनात फार जुन्या आठवणी जाग्या झाल्या. माझ्या समोर जमलेल्या, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून प्रचंड संख्येने आलेल्या तुम्हा शेतकरी भावाबहिणींपैकी अनेकांचा जन्मही झाला नव्हता त्या वेळी म्हणजे ५१ वर्षांपूर्वी मी मुंबईला महाविद्यालयात अर्थशास्त्र हा विषय शिकवायला सुरुवात केली. महाविद्यालय मान्यवर होते, तेथील विद्यार्थी उच्चविद्याविभूषित होण्याच्या आकांक्षेने आलेले, मोठ्या संख्येने बड्या, सुसंस्कृत घरातून आलेले. माझीही शिकवण्यामध्ये थोडीफार ख्याती झालेली त्यामुळे इतर महाविद्यालयांतील काही विद्यार्थीसुद्धा मी शिकवीत असलेले अर्थशास्त्र ऐकण्यासाठी नाही तरी माझे इंग्रजी कानी पडावे यासाठी वर्गात येऊन बसत असत; पण आज ५१ वर्षांनंतर ३ दिवसांच्या या अधिवेशनामध्ये मी जो अनुभव घेतला तो ५१ वर्षांपूर्वीच्या अध्यापकीमध्ये मला कधीही आला नव्हता हे मी प्रामाणिकपणे कबूल करतो. माझ्या कॉलेजमधील अध्यापकीच्या वेळी मला नियम करावा लागला होता की, एकदा का माझे शिकवणे सुरू झाले की त्यानंतर वर्गामध्ये कोणी आत येऊ नये. कारण माझ्या बोलण्यामध्ये खंड पडतो, व्यत्यय येतो. तेथे नियम करावा लागला पण येथे गेले तीन दिवस आपल्या अधिवेशनाचा वर्ग २७ तास चालला आणि त्या २७ तासांतील किमान पाच तासतरी मी स्वतः बोललो; पण या पाच तासांमध्ये एकदाही कोणी आता आत प्रवेश करू नये असे सांगावे लागले नाही, कोणी आता गडबड करू नये असे सांगावे लागले नाही. शहरांतील सुसंस्कृत आणि बड्या घरांतून उच्चविद्या संपादनाच्या आकांक्षेने आलेल्या विद्यार्थ्यांना जे जमले नाही ते या सगळ्या सातवीआठवी पास किंवा नापासही अशा माझ्या या विद्यार्थ्यांनी करून दाखवले आणि म्हणून मी तुम्हा सगळ्यांचे अभिनंदन करतो

माझ्या शेतकरी भावांनो मायबहिणींनो / २९८