पान:माझ्या शेतकरी भावांनो आणि मायबहिणींनो... (Mazya Shetkari Bhavanno Mayabhaininno...).pdf/२९६

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

ठरविण्याचा अधिकारही इतर शेतीमालांप्रमाणेच शेतकऱ्यांच्या हाती नाही, तर शेततेल पेट्रोलमध्ये मिसळून पेट्रोलच्या भावात विकण्याची मुभा असलेल्या पेट्रोलियम कंपन्यांच्या हाती. तेलाचा तुटवडा असतानाही केंद्र सरकारने देशातील तेलाच्या साठ्यांचा शोध लावण्याचे खास प्रयत्न केले नाहीत. त्यामुळे या पेट्रोलियम कंपन्यांना आणि केंद्रातील सत्तेच्या वर्तुळातील काही हितसंबंधियांना अरब राष्ट्रांतून खनिज तेलाची आयात होत राहण्यात स्वारस्य असावे अशी शंका येते. अगदीच प्रयत्न होत नाहीत असे कोणी म्हणून नये म्हणून एका सरकारी कंपनीमार्फत कृष्णागोदावरीच्या खोऱ्यांत खनिज तेलाचा शोध घेतला गेला. या खोऱ्यांत अजिबात तेल नाही असे त्या कंपनीने सांगितले; पण एका खासगी कंपनीच्या पाहणीनुसार या खोऱ्यांत संपूर्ण देशाला दहा वर्षे पुरेल इतका साठा आहे. सरकारच्या परवानगीशिवाय तो कोणालाही जमिनीबाहेर काढता येणार नाही. देशात उपलब्ध तेल न शोधणे, अरब राष्ट्रांतून महागड्या तेलाची आयात करणे, मतांवर डोळा ठेवून पेट्रोल कंपन्यांना अनुदाने देऊन लोकांना स्वस्त दरात पेट्रोल व डिझेल पुरविणे आणि प्रदूषण न करणाऱ्या 'शेततेला'चे उत्पादन आणि वापर यांना अटकाव करणे हे सरळ सरळ देशद्रोही कृत्य आहे.
 तुमच्या शेतामध्ये शेततेलाच्या रूपाने लक्ष्मी सापडली म्हणून त्याला आपसुक भाव मिळणार आहे असे धरू नका. शेतीमालाला भाव मिळवायचा असेल तर तो कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आडत्याकडून मिळणे काही शक्य नाही. आजच्या युगात ते मिळायची शक्यता तंत्रज्ञानानेच शोधलेली आहे. असे तंत्रज्ञान आज उपलब्ध आहे. तुम्ही पेरणी करण्याच्या वेळी कोणाकडे कॉम्प्युटर असला तर त्याच्याकडे जाऊन बघा. तुम्ही तूर, कापूस जे काही पेरणार असाल त्याला हंगामाच्या वेळी काय भाव मिळणार आहे हे तुम्हाला पाहायला मिळणार आहे. एवढेच नाही तर, तो भाव तुम्हाला मिळायचा करार (कॉन्ट्रक्ट) हंगाम यायच्या आधीही करता येईल; पीक निघाल्यानंतर तुम्ही ठरवले की आता विकायचे, ठीक आहे; मला आता नाही विकायचे नाही तर नाही; पण चार महिन्यांनी जेव्हा भाव चढतील तेव्हा विकायचे आहे तर तुम्हाला चार महिन्यांनंतरचा भाव देणारे तंत्रज्ञान तयार आहे. तुम्ही म्हटले माझ्या भाजीला इथे परभणीत भाव नाही, मुंबईला भाव आहे तर या तंत्रज्ञानाने तुम्हाला मुंबईचा भावसुद्धा मिळू शकेल. काळाचे बंधन नाही, स्थळाचे बंधन नाही; शेतकऱ्याला पाहिजे तो भाव देणारे तंत्रज्ञान निघाले आहे. ते म्हणजे I, माहिती तंत्रज्ञान. त्याच्यासाठी तुम्हाला स्वतःचा काँप्युटर बाळगण्याची आवश्यकता नाही. आज कित्येक शेतकऱ्यांच्या तरुण पोराकडे मोबाईल आहे, ही माहिती तुम्हाला मोबाईल फोनवर मिळू शकते.

माझ्या शेतकरी भावांनो मायबहिणींनो / २९६