पान:माझ्या शेतकरी भावांनो आणि मायबहिणींनो... (Mazya Shetkari Bhavanno Mayabhaininno...).pdf/२९४

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

आणि खासदार म्हणून मते मिळवून दिली तरच तुम्हाला शेती चालवता येईल; दुसऱ्या कोणालाही मते दिली तर तुमची शेती टिकू शकत नाही.
 मग, आता काय करायला पाहिजे? हरिक्रांतीचे तंत्रज्ञान मी सांगितले, बायोटेक्नोलॉजीचे तंत्रज्ञान मी सांगितले. आपण ती तंत्रज्ञाने सध्या बाजूला ठेवू. औरंगाबादच्या अधिवेशनात आपण त्याच्या पुढच्या तीनचार तंत्रज्ञानांचा विचार करणार आहोत.ही जी तंत्रज्ञाने आहेत त्यांची माहिती औरंगाबादच्या अधिवेशनात सर्व शेतकऱ्यांना दिली जाईल आणि एवढेच नाही तर, त्या तंत्रज्ञानाचे प्रात्याक्षिक, त्या तंत्रज्ञानाची यंत्रसामग्री तुम्हाला पाहायला मिळेल आणि त्या तंत्रज्ञानाचा ज्यांनी यशस्वी प्रयोग केलेला आहे त्यांची भाषणेसुद्धा ऐकायला मिळणार आहेत.
 पहिले तंत्रज्ञान - याचे नाव इंग्रजीत एरोपोनिक्स् – पण आपण याला सध्या 'A' तंत्रज्ञान म्हणू. दिल्लीला माझ्या घरी जेवणाच्या टेबलावर मावेल एवढे एक खोके आहे. त्या एका खोक्यामधून माझ्या संपूर्ण घराला पुरेल एवढी भाजी, त्याशिवाय, माझ्या त्या इमारतीमध्ये राहणाऱ्या सर्वांना पुरेल इतकी ताजी भाजी काढू शकतो. हे नवे तंत्रज्ञान हरितक्रांतीच्याही पुढे गेलेल्या बायोटेक्नॉलॉजीच्या पुढे गेलेले तंत्रज्ञान आहे. बायोटेक्नोलॉजीचा अनुभव बीटी कॉटनच्या रूपाने तुम्ही घेतला आहे. तुम्हाला जर का हवामान बदलत आहे, वरुणराज कोपतो आहे, सूर्यदेव रागावतो आहे याच्यावर उपाय काढायचा आहे तर 'जुनी बियाणी वापरा, तीच चागंली होती; जुन्या बियाण्याच्या गव्हाला जी काय चव होती ना ती चव नव्या जातीच्या बियाण्याला नाही वगैरे' हा वाह्यातपणा सोडून द्या. आज शास्त्रज्ञ असे नवीन बियाणे तयार करायला लागले आहेत की दुष्काळ पडला तरी ते उगवायला लागते, तापमान ५० अंशांच्या वर गेले तरीसुद्धा पिकते, एवढेच नाही तर, ते तापमान कमी होत होत एक अंशावर जरी आले तरी पिकत राहील. साधारणपणे कोणत्याही बियाण्याला पिकण्यासाठी अमुक ते अमुक असे उष्णतामान पाहिजे असते. पण उष्णतामान कितीही वाढो, कितीही कमी होवो तरी ते पीक येईल अशा तऱ्हेची बियाणी तयार होत आहेत. या तंत्रज्ञानाचे नाव आहे 'B' बायोटेक्नोलॉजी. बीटीतून त्याचा तुम्ही अनुभव घेतला आहे.
 आणखी एका तंत्रज्ञानाची तुम्हाला माहिती झाली पाहिजे. डिझेल महाग झाले, पेट्रोल महाग झाले. पेट्रोलची किंमत ५६ रुपये लिटर झाली आहे. डिझेलही तसेच महाग झाले आहे. दरवर्षी बलिप्रतिपदेच्या दिवशी शेतकरी मायमाऊल्या 'ईडा पिडा टळू दे, बळिचे राज्य येऊ दे' अशी प्रार्थना करतात. आपणही शेतकरी संघटनेच्या ध्येयवाक्यात धरले आहे की बळिराज्य येणार आहे. ते बळिराज्य खरोखरच येते आहे; बळिराजाने आपला दूत आधीच पाठवला आहे.

माझ्या शेतकरी भावांनो मायबहिणींनो / २९४