पान:माझ्या शेतकरी भावांनो आणि मायबहिणींनो... (Mazya Shetkari Bhavanno Mayabhaininno...).pdf/२९३

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

केली म्हणजे सरकार शेतीमालाला भाव देईल. ३० वर्षांच्या आंदोलनानंतर आपल्याला काय दिसते? आजही सरकार शेतीमालाला भाव देत नाही, उलट, महागाई झाली म्हणजे स्वातंत्र्यानंतरच्या सर्व सरकारांनी जे केले तेच आजचे सरकार करीत आहे. मनमोहनसिंगांच्या सरकारने तर देशाच्या बाहेरून तेलाची आयात केली आणि देशातील तेलाचे, तेलबियांचे भाव पाडले; तांदळाच्या निर्यातीवर बंदी आणली आणि तांदळाचे भाव पाडले; मक्याचे भाव पाडले, दुधाचे भाव पाडले एवढेच नव्हे तर,शेतकऱ्यांना भावाची हमी देऊ शकणाऱ्या वायदेबाजाराची पद्धतशीरपणे गळचेपी केली. सोयाबीनच्या शेतकऱ्यांना मी सांगतो ते उदाहरण पटेल. ज्या वायदे बाजारामुळे सोयाबीनची किंमत २३०० रुपये होती तो वायदे बाजार बंद केल्यामुळे झटक्यात १२०० ते १३०० रुपये इतकी खाली पडली आहे. मनमोहन सिंगाचे हे तथाकथित खुलीकरणवादी सरकार शेतकऱ्यांच्या बाबतीत नेहरूंच्या समाजवादी सरकारइतकेच दुष्ट आणि क्रूर आहे. 'चला, तुमची कर्जे माफ केली' अशा कितीही लालची त्यांनी दाखवल्या तरी ते शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळू देणे शक्य नाही.
 आम्ही कर्जमाफी मागितलेली नव्हती; माफी मागायला आम्ही काही गुन्हेगार नाही. आम्ही कर्जमुक्ती मागितलेली होती. का मागितली कर्जमुक्ती? शेतकऱ्यांची सगळी कर्जे ही बेकायदेशीर आहेत म्हणून, अनैतिक आहेत म्हणून आम्ही कर्जमुक्ती मागितली होती, कोणाची मेहेरबानी म्हणून मागितली नव्हती. भाकरीचे दोनचार तुकडे कुत्र्यांच्या गर्दीमध्ये टाकले म्हणजे त्या चार तुकड्यांसाठी कुत्र्यांची मारामारी लागते आणि मग थोडा वेळ करमणूक होते; कुत्र्यांचे लक्ष नाही या खात्रीने हवा तर डल्लाही मारणे सोपे जाते या भावनेनेच मनमोहन सिंग सरकारने ही कर्जमाफी योजना जाहीर केली आहे. 'तू छोटा शेतकरी, तुला देतो, तू मोठा शेतकरी तुला देत नाही; तू सावकाराकडून कर्ज घेतले तुला देत नाही, तू बँकेकडून घेतले तुला देतो; तू बँकेत, सहकारात कोणी पदाधिकारी आहेस, चेअरमन आहेस, तुझे सगळे कर्ज माफ; तुम्ही भाऊभाऊ वेगळे राहता तुम्हाला माफ, तुम्ही भाऊभाऊ एकत्र राहून म्हाताराम्हातारीचा सांभाळ करता तुम्हाला नाही' अशा भांडणे लावण्याच्या यांच्या एक ना अनेक क्लृप्त्या.
 सरकारचा हा दुष्टपणा पुढे चालूच राहणार असेल तर शेतकऱ्यांना या लोकांवर अवलंबून राहून चालणार नाही. शेतकऱ्यांना अशा तऱ्हेने, वेगळ्या पद्धतीने शेती करावी लागणार आहे की जिथे सरकार असो किंवा नसो, थोडी हिम्मत दाखवली, थोडे वेगळे वागलात, अगदी निवडणुकीच्या वेळेस आपल्या जातीच्या उमेदवाराला मत देण्याचे जरी बंद केले आणि शेतकरी संघटनेच्या उमेदवारांना आमदार

माझ्या शेतकरी भावांनो मायबहिणींनो / २९३