पान:माझ्या शेतकरी भावांनो आणि मायबहिणींनो... (Mazya Shetkari Bhavanno Mayabhaininno...).pdf/२९१

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

राहिलो तरी आमची पोरेबाळे करणार नाहीत' आणि त्यांचा अनुभव असे सांगतो की, ज्यांनी शेती सोडली आणि दुसरे काही केले त्यांचे वाटोळे झाले असे एकही उदाहरण हिंदुस्थानात सापडणार नाही. ज्यांनी धाडस केले आणि शेती सोडली त्यांचे भलेच झाले.
 मी मागे एक उदाहरण दिले होते तेच आता पुन्हा सांगतो. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश चंद्रचूड हे माझ्या खेड तालुक्यातील, मूळचे शेतकरी होते. निवृत्त व्हायच्या वेळी ते तालुक्यात आले, माझ्याकडे आले आणि म्हणाले, चला माझी शेती, गाव दाखवतो आणि मी गेलो. एका टेकडीवरून त्यांनी असाऽ हात करून सांगितले, 'ही जी सगळी जमीन आहे ना ती सगळी जमीन माझ्या बापजाद्यांची होती, कूळकायद्यात गेली' आणि त्यांनी थोडे अभिमानाने सांगितले की, 'कूळकायद्यानुसार या सगळ्यांकडून काही पैसे घ्यायचे होते; कुणाकडून दहा हजार, कुणाकडून वीस हजार. आम्ही ठरवले, जाऊ दे. आम्ही उदार अंत:करणाने हे कूळकर्ज माफ केले आणि आम्ही दिल्लीला गेलो.' मी म्हणालो की, 'चंद्रचूड साहेब, तुम्ही दिल्लीला गेला; जाताना मोठे औदार्य दाखवले आणि त्यांचे कूळकायद्यातील कर्ज माफ केले. तुम्ही दिल्लीला गेला आणि सरन्यायाधीश झालात. ज्यांच्यावर तुम्ही मेहरबानी केली असे तुम्हाला वाटते आहे ते हे सगळे शेतकरी कर्जाखाली दबून आज आत्महत्या करायला निघालेत.' ते म्हणाले, 'शेती सोडून जे जातात ते सगळे काही सर न्यायाधीश होतात अशी परीस्थिती नाही.' मी म्हणालो, 'शेती सोडून दिल्लीला गेल्यानंतर वकील व्हायच्या ऐवजी तुम्ही पानाची गादी लावून पाने जरी विकली असती तरी तुमची परिस्थिती या शेतकऱ्यापेक्षा चांगली असती हे लक्षात ठेवा.'
 मुळशी धरणाच्या वेळी सेनापती बापटांनी आंदोलन केले. आम्ही याचा अभ्यास केला. धरणग्रस्त म्हणून जे शेतकरी तेथून उठून मुंबईला गेले ते सांताक्रूझ, विलेपार्ले भागात राहतात. त्यांची सगळ्यांची स्थिती चांगली आहे. मुळशी धरण झाल्यावर आपल्याला पाणी मिळेल, आपण हिरवीगार शेती करू आणि लक्ष्मी आपल्या घरात पाणी भरेल अशी ज्यांची कल्पना होती ते सगळे कर्जबाजारी झाले; त्यांना कर्जमाफीचासुद्धा फायदा मिळाला नाही हे सत्य आहे.
 तुम्हीतरी कसली शेती करता? मराठवाड्यातल्या सगळ्या जिल्ह्यांत मी फिरलो, सगळीकडे लोक म्हणू लागले आहेत, 'साहेब, ते शेतीमालाच्या भावाचे राहू द्या; आधी पिकवायला खूप कष्ट करायला लागतात, मग त्याचा भाव मिळायचा. त्याच्यापेक्षा या मोबाईल टेलीफोनच्या कंपन्या आहेत त्यांना आमच्या शेतात टॉवर उभा करायला सांगा. म्हणजे मग आम्हाला त्याचे भाडे मिळेल.

माझ्या शेतकरी भावांनो मायबहिणींनो / २९१