पान:माझ्या शेतकरी भावांनो आणि मायबहिणींनो... (Mazya Shetkari Bhavanno Mayabhaininno...).pdf/२९०

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

लागले ते नवीन प्रश्न. असे केव्हाही म्हणता येत नाही की मी सगळे प्रश्न सोडवले. एक प्रश्न सुटला की दुसरा काहीतरी प्रश्न निर्माण होतो. औरंगाबादला आपण चर्चा करणार आहोत ती थोडक्यात, जुन्या समस्या संपल्या. नवीन समस्या येत आहेत आणि पहिल्यापेक्षाही त्या भयानक आहेत आणि त्यांचा सामना कसा करायचा?
 काल मराठवाड्यात पाऊस पडला. सगळे हैराण झाले की कोठून आला हा? पाऊस पडला चांगले झाले. आता पेरणी चालू झाली; पण ही काही पाऊस यायची वेळ नाही. पाऊस लहरीपणा दाखवू लागला आहे. 'नेमेचि येतो मग पावसाळा' ही ओळ आता जुनी झाली आहे. पूर्वी जून महिन्यात मृग नक्षत्राचा पाऊस झाला की चार महिने तो पडायचा आणि शांत व्हायचा.
 हा पावसाळा आता फार लहरी झाला आहे. मुंबईला हल्ली पडायला लागला की एकदाच बदाबदा पडतो, रस्तेबिस्ते गच्च करून टाकतो. उन्हाळा सुरू झाला म्हणजे सूर्यबाबाही तसाच तापायला लागला. तुम्हाला मराठवाड्यामध्ये सगळ्यांना ४० अंश, ४२ अंश तापमानाची सवय आहे; पण जर का उष्णतामान ४८ नाहीतर ५० अंशापर्यंत जाऊ लागले, माणसाला चालता चालता भोवळ येऊ लागली तर तुम्ही कसे जगायचे आणि पीक कसे वाचवायचे? अशा एक एक नवीन समस्या तयार होताहेत. त्याला उत्तर काय? एअरकंडीशनर लावावा, पंखा लावावा तर वीज नाही.
 वीज नाही म्हणून आपण पिकांना पाणी देण्याकरिता डिझेल वापरून डिझेलवर चालणारा पंप वापरू म्हटले तर डिझेल नाही. कारण, डिझेल दुर्मिळ, अत्यंत महाग झाले आहे.
 असा चारही बाजूंनी शेतकरी कोंडला जात आहे. त्याच्यामध्ये आणखी एक विचित्र घटना सर्वदूर घडते आहे - म्हटले तर फायद्याची, म्हटले तर तोट्याची. उदाहरणार्थ, जालन्याजवळ ज्या जमिनीचा भाव एकरी पाच ते दहा हजार रुपये होता ती जमीन आज ७० लाख रुपये भावाने जात आहे. शेतकरी विचार करणार की हे काय होऊन राहिले आहे? एका बाजूला वरुणबाबा रागावला, पाऊस येत नाही; सूर्यबाबा रागावला, तापमान वाढायला लागले. मग, शेती करायची कशी? आधीच जे शेतकरी आत्महत्या करायला लागले आहेत त्याची ही मनःस्थिती. नियोजन मंडळाचा एक अभ्यास असे सांगतो की, भारतातील ४० टक्के शेतकरी म्हणताहेत की, शेती करायची आता आमची इच्छा नाही. बापजाद्यांनी ठेवली म्हणून आम्ही हे ओझे चालवले. 'सौ के साठ करना और बाप का नाम चलाना।' असा हा धंदा. बापाचे नाव चालविण्याकरिता दरवर्षी तोट्यात जायचे असली ही शेती आता आमच्याने झेपत नाही. आम्ही करीत

माझ्या शेतकरी भावांनो मायबहिणींनो / २९०