पान:माझ्या शेतकरी भावांनो आणि मायबहिणींनो... (Mazya Shetkari Bhavanno Mayabhaininno...).pdf/२८६

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 'तंत्रज्ञानविहीन' शेतीच्या जागी भरघोस पीक देणारी 'बैलाची शेती व्हायला लागली आणि शेतीमध्ये दसपट, वीसपट पीक यायला लागले. ते पीक लुटायला लुटारू, दरोडेखोर यायला लागले. ही गोष्टही मी तुम्हाला अनेकवेळा सांगितली आहे. शेतकऱ्यांनी बैलांनी शेती केली आणि घोड्यावरून लुटारू, दरोडेखोर आले आणि शेतकऱ्यांनी पिकवलेले धान्य घेऊन जाऊ लागले हाही भाग मी पूर्वी अनेकदा सांगितलेला आहे. अशा तऱ्हेने धान्याचे पीक वाढत गेले आणि सगळ्या लोकांना पुरेसे खाद्यान्न मिळायला लागले; एवढेच नव्हे तर, त्यांच्या खळ्यावर धान्य शिल्लक राहू लागले. हे मी परभणीला १९८४ मध्ये बोललो आहे आणि २००४च्या परभणी रौप्यमहोत्सवी मेळव्यातही बोललो आहे.
 आता मी एकदम उडी मारतो आणि प्राचीन काळापासून ते चारशे वर्षापूर्वीच्या कालखंडात येतो, जेव्हा सगळीकडे अन्नधान्य भरपूर होते. त्या वेळी इंग्लंड देशामध्ये माल्थस नावाच्या एका मोठ्या विचारवंत माणसाने एक प्रश्न उभा केला. माल्थसने म्हटले, शेतीमधील बायकांच्या हातची काठी काढून तिथे बैल लावला आणि खूप पिकायला लागले म्हणजे कायमच मनुष्यजातीला पाहिजे तितके अन्नधान्य पिकेल ही चुकीची समजूत आहे. माणसांची संख्या प्रचंड वेगाने वाढत आहे. एक जोडपे असेल तर त्यांना दोन मुले होतात, दोनाची चार मुले होतात, चाराची आठ होतात, आठाची सोळा होतात, सोळाची बत्तीस अशा तहेने माणसांची संख्या प्रचंड वेगाने वाढते आहे आणि जमिनीवर तुम्ही बैल जरी लावला तरीसुद्धा इतक्या प्रचंड वेगाने वाढणाऱ्या मनुष्यजातीला खायला घालणे अशक्य होईल. कारण, जमीन वाढत नाही.' तेव्हा, माल्थस या विचारवंताने पहिल्यांदा भाकीत केले की, मनुष्य जात सदा भरपेट खाऊन राहील ही अशक्य गोष्ट आहे; जोपर्यंत जमीन कमी आहे तोपर्यंत उपासमार होणार आहे, माणसे दुबळी होणार आहेत, त्यामुळे रोगराई होणार आहे आणि अन्नधान्य नाही म्हणून लोकांच्या लढाया होणार आहेत. थोडक्यात, मनुष्य जातीचा अंत हा काही सुखान्त नाही, शोकान्त आहे असे माल्थसचे म्हणणे होते.
 तसे झाले का? तसे झाले असते तर आज तुम्ही आम्ही इथे नसतो. आपण इथे आहोत याचा अर्थ असा की मनुष्यजातीचा, माल्थसच्या सिद्धांताप्रमाणे, दुखान्त झाला नाही. का नाही झाला?
 माणसामध्ये एक विशेष गोष्ट आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे माणूस आणि इतर कोणतेही जनावर यात महत्त्वाचा फरक आहे. जनावरांना पुष्कळ गोष्टी अशा येतात, की ज्या मनुष्याला येत नाहीत. माणसाला जनावरांच्या गतीने धावता येत नाही, माणूस पक्ष्यासारखे उडू शकत नाही, माशासारखे पोहू शकत

माझ्या शेतकरी भावांनो मायबहिणींनो / २८६