पान:माझ्या शेतकरी भावांनो आणि मायबहिणींनो... (Mazya Shetkari Bhavanno Mayabhaininno...).pdf/२८४

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.


निमंत्रण औरंगाबाद अधिवेशनाच


 मी तुमच्याकडे का आलो आहे हे तुम्हाला माहीत आहे. २८ सप्टेंबरपासून मी मराठवाड्याचा दौरा करतो आहे. जिल्ह्याजिल्ह्यात जाऊन मराठवाड्यातील शेतकऱ्यांना निमंत्रण देतो आहे.८, ९ आणि १० नोव्हेंबर २००८ ला औरंगाबाद येथे शेतकरी संघटनेचे ११ वे अधिवेशन होत आहे आणि त्याला तुम्ही यावे अशी विनंती करण्याकरिता आणि तसे निमंत्रण देण्याकरिता मी आलो आहे; पण हे अधिवेशन इतके महत्त्वाचे आहे की हे निमंत्रण देताना शेतकरी संघटनेचा, एवढेच नव्हे तर सबंध शेतीचा इतिहास सांगायला सुरुवात मी करणार आहे. परभणी जिल्हा इतका महत्त्वाचा आहे आणि अलीकडे कापसाच्या उत्पादनामुळे, कापसाच्या व्यापारामुळे आणि कारखानदारीमुळे मानवत भागामध्ये जी काही आर्थिक उलाढाल झाली आहे ती पाहता मी जे काही मांडणार आहे ते समजण्याइतपत तुमचा गृहपाठ निश्चितच झालेला आहे.
 पहिल्यांदा दोन महिलांनी गाणी म्हटली आणि त्यांच्या गाण्यांतून मांडलेला विषय हाच होता की शेती ही पहिल्यांदा पुरुषांची नव्हतीच, शेती ही पहिल्यांदा महिलांची होती. हे माझ्या पुस्तकातून तुम्ही वाचलेले आहे. ज्या वेळी पुरुष हे जंगलात जाऊन शिकार करायचे किंवा जंगलातून फळेमुळे तोडून आणायचे त्यावेळी बायका शेती करीत होत्या. पुरुषांनी शिकार करून आणली म्हणजे ती बायकांच्या हाती द्यायची आणि ती दिल्यानंतर कुटुंबातल्या, टोळीतल्या सगळ्या लोकांना सारखी वाटून द्यायची हे काम बायांकडे आले आणि साहजिकच, सध्या जसे आपल्याकडे होते तसेच त्याही वेळी व्हायचे की काही वेळा सगळ्यांना वाटून झाल्यावर बायांना तोंडात घालायला काहीच राहात नसे आणि असे आजही बरेचदा होते. सगळ्यांना जेवायला घातल्यानंतर बाईला खायला काहीच नसेल तर ती काय करते? एखादा तुकडा राहिला असला तर तोंडात घालते, नाहीतर तसेच तांब्याभर पाणी पिते आणि झोपी जाते. त्याही वेळी तसेच होत

माझ्या शेतकरी भावांनो मायबहिणींनो / २८४