पान:माझ्या शेतकरी भावांनो आणि मायबहिणींनो... (Mazya Shetkari Bhavanno Mayabhaininno...).pdf/२७६

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

नाहीत. त्यांच्यासारख्या सर्व साधनसामग्री हाताशी असलेला मनुष्य जर शेतकरी संघटनेचा नेता झाला तर केवढी जबरदस्त संघटना व्हायला हवी होती. त्यावेळी त्या संघटनेबद्दल पत्रकारांनी माझी प्रतिक्रिया विचारली. मी म्हटले, "पावसाळ्यात अनेक पाकोळ्या जन्माला येतात. एका पावसाळ्यात त्यातल्या त्यात जरा मोठ्या आकाराच्या पाकोळ्याला वाटले की आपल्यापेक्षा मोठे काहीच असू शकत नाही. मग, तो गरुडाकडे गेला आणि म्हणाला, 'मी बघ केवढा मोठा आहे. मला तुझ्या मुलीशी लग्न करायचे आहे.' गरुडाने त्याला सांगितले, 'पावसाळा संपेपर्यंत थांब. त्यानंतर मुहूर्त येतील त्यातल्या एका मुहूर्तावर तुझे लग्न लावून देऊ.' पावसाळा संपला आणि पाकोळ्याची जीवनयात्रा संपली. वसंतदादांची संघटना चार महिने चालली तरी खूप होईल."
 संघटना चालवणे म्हणजे पक्ष चालवणे नाही की जेथे पैशांच्या थैल्याच्या थैल्या समोर येऊन पडतात. शेतकरी संघटना चालवणे हे भणंग वैराग्याचे व्रत आहे, सर्वस्वाचा त्याग करून चालवण्याचे व्रत आहे; शेतकऱ्याला परमेश्वर मानून त्याच्यासाठी कष्ट करायचे व्रत आहे. चार महिनेसुद्धा हे व्रत चालवणे ऐऱ्यागैऱ्याचे काम नाही हे मी गेली पंचवीस वर्षे शेतकरी संघटनेचे जू खांद्यावर सांभाळण्याच्या अनुभवातून सांगतो आहे. वसंतदादांची शेतकरी संघटना चार महिनेसुद्धा टिकली नाही.
 खरे शत्रू ओळखा
 आजकाल तर फारच लहानशा पाकोळ्या आपण बेडकाच्या आकाराचे असलो तरी बैलापेक्षा मोठे असल्याचा आव आणीत आहेत. या लोकांविषयी फारशी चिंता करू नका. त्यांनी शरद जोशींना शिव्या घातल्या तर त्याने काही डाग पडत नाही, तुम्ही त्यांच्याकडे दुर्लक्ष करा. जोपर्यंत ते शेतकरी संघटनेच्या कार्यक्रमामध्ये अडथळा आणीत नाहीत तोपर्यंत त्यांच्याविषयी चिंता करण्याचे कारण नाही. ते त्यांच्या त्यांच्या बुद्धीप्रमाणे, १९८० सालची माझी भाषणे ऐकून ते जे शिकले त्या शिदोरीवर कोणी दूध आंदोलन करीत असले, कोणी आणखी काही पिकाचे आंदोलन करीत असले तर करू द्या.
 आपले शत्रू हे आपल्यातून किरकोळ फुटलेले लोक नाहीत हे लक्षात घ्या. आपले शत्रू सरकार आहे, आपले शत्रू नंबर एक काँग्रेस आहे हे लक्षात ठेवून काँग्रेसचीच काही मंडळी शेतकऱ्यांचे लक्ष इकडे तिकडे जावे याकरिता अशी काही मंडळी फोडून उभी करीत असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यांच्याकडे दुर्लक्ष करा आणि पक्ष्याचा डोळा वेधायचा म्हटल्यानंतर फक्त पक्ष्याचा डोळाच दिसणाऱ्या अर्जुनाच्या एकतानतेने कर्जमुक्तीवरच लक्ष ठेवा आणि तरच कर्जमुक्ती

माझ्या शेतकरी भावांनो मायबहिणींनो / २७६