पान:माझ्या शेतकरी भावांनो आणि मायबहिणींनो... (Mazya Shetkari Bhavanno Mayabhaininno...).pdf/२६७

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.


शेतकरी आंदोलनाची आगामी दिशा


 सांगली जिल्ह्यातील या जाहीर सभेला उपस्थित असलेल्या सगळ्या शेतकरी भावांचे आणि मायबहिणींचे मी पहिल्यांदा आभार मानतो. पुण्याहून निघताना काही वर्तमानपत्रांतील बातम्या वाचून माझी अशी समजूत झाली होती की शेतकरी संघटना दक्षिण महाराष्ट्रात जवळजवळ संपत आली आहे आणि तुमच्या या सभेला फारसे कोणी येतील असे वाटत नव्हते. हे सर्व खोटं ठरवत तुम्ही ही भावे सभागृह गच्च भरवत जमला आहात याबद्दल मी तुमचे हे आभार मानीत आहे.
 संन्याशाचे वैभव
 जून महिन्याच्या सुरुवातीला पिंपळगाव (बसवंत) येथे झालेल्या शेतकरी संघटनेच्या सभेमध्ये श्री. तुकाराम निरगुडे यांनी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष व्हावे अशी मी घोषणा केली. तुकाराम निरगुडे हे माझे फार जुने सहकारी. चाकणचे कांद्याचे आंदोलन झाल्यानंतर नाशिक जिल्ह्यात मला घेऊन जाणारे ते तुकाराम निरगुडे. त्यानंतरच नाशिक जिल्ह्यातील ऊस आंदोलनाचे महाभारत घडले. राज्याच्या बाकीच्या जिल्ह्यांमध्ये त्यांच्याबद्दल फारशी माहिती नाही. 'कोण तुकाराम निरगुडे? ते कसे काय एकदम अध्यक्ष झाले?' असादेखील प्रश्न काही लोकांच्या मनात आला. आज सकाळी माझ्या असे लक्षात आले की आंदोलनामध्ये अनेकवेळा अपघात होतात, चमत्कार होतात तसा माझ्या हातून एक चमत्कार होऊन गेला आहे, की शेतकरी संघटनेचे अध्यक्षपद सांभाळण्यासाठी तुकाराम निरगुडे हातात लागले आहेत.
  काल संध्याकाळी तुकारामजी माझ्याजवळ बसले आणि म्हणाले की, "मी नुकताच विदर्भाचा व मराठवाड्याचा दौरा केला आणि आता इथे दक्षिणेतही आलो आहे. माझी स्वतःची अडचण अशी की माझ्याकडे स्वतःची गाडी नाही. कोणाचीही गाडी घेतली तरी त्यामध्ये पेट्रोल डिझेल घालायला पाहिजे. एखाद्या

माझ्या शेतकरी भावांनो मायबहिणींनो / २६७