पान:माझ्या शेतकरी भावांनो आणि मायबहिणींनो... (Mazya Shetkari Bhavanno Mayabhaininno...).pdf/२५७

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

राहत नाहीत अशा लोकांची लोकशाही येथे तयार व्हावी आणि सगळ्या देशाला समृद्ध करून सगळ्या जगाला दीपवून टाकणारी पोशिंद्यांची वैभवशाली लोकशाही येथे तयार व्हावी याकरिता स्वतंत्र भारत पक्ष काम करतो आहे.
 शेतकऱ्यांवरील अन्याय त्यांच्या लक्षात आल्यावर शेतकरी उठले; आता व्यापारी, वाहतूकदार आणि इतर उद्योजकांवर तसाच अन्याय होतो आहे. त्यासाठी स्वतंत्र भारत पक्ष उठतो आहे आणि गेली काही वर्षे विकासाच्या नावाखाली जी भाषा चालली आहे त्या भाषेचा लोकांना कंटाळा आला आहे. 'गरिबी हटावो', 'गरिबांचे भले पाहा', 'आम आदमी' असे जे शब्द वापरून सगळे पुढारी आपापले खिसे भरताहेत त्या शब्दांमागील ढोंगीपणाचा लोकांना कंटाळा आलेला आहे. त्याच्यापेक्षा, उद्योजकांच्या हाती जर देश दिला तर भारतीय उद्योजक आज जगामध्ये काय प्रकारचा पराक्रम गाजवत आहेत हे पाहता, देशाला ऊर्जितावस्था प्राप्त व्हायला वेळ लागणार नाही. पंचवीस वर्षांपूर्वी, नेहरूप्रणीत समाजवादाचा भर असताना, जगातील मोठ्या माणसात हिंदुस्थानातील इतकी माणसे असतील असे स्वप्न कोणाला पडले असते? हिंदुस्थानातील लोकांच्या हातात कर्तबगारी आहे, त्याला फक्त वाव द्या, त्याच्या कर्तबगारीच्या आड येऊ नका एवढे सांगणारा स्वतंत्र भारत पक्ष आहे.
 केवळ जकातीच्या आंदोलनापुरते मर्यादित राहू नका. तुमच्या बेड्या तोडण्याकरिता मी तुम्हाला मार्ग दाखवला आहे. एकेका महानगरपालिकेची जकात रद्द करण्याकरिता आम्ही तुमच्या सोबत येणार आहोत. स्वतंत्र भारत पक्षाची ही लढाई संपल्यानंतर व्यापारी भावांनी दुकानांत जाऊन बसायचे नाही. इतर व्यावसायिकांच्या उद्योजकांच्या स्वातंत्र्याच्या लढाईकरिताही तुम्हाला उभे राहावे लागेल. महात्मा गांधींच्या स्वातंत्र्यलढ्यात व्यापारी समाज त्यांच्यामागे उभा राहिला आहे. आज आपण स्वातंत्र्याची दुसरी लढाई लढत आहोत. पहिली स्वातंत्र्याची लढाई फसली, आज सांगलीतून दुसऱ्या लढाईची सुरुवात झाली आणि त्यामध्ये व्यापारी, वाहतूकदार, उद्योजक, शेतकरी, मजूर सगळे एकत्र आले आहेत अशी खात्री बाळगतो.
 केवळ दोन शेतकरी संघटना नव्हे तर सर्वच पोशिंद्यांचा संगम येथे घडला या बद्दल आनंद व्यक्त करतो आणि माझे भाषण संपवितो. धन्यवाद.

(२८ जुलै २००७ - जकात विरोधी आंदोलन, सांगली)
(शेतकरी संघटक ६ ऑगस्ट २००७)

◼◼

माझ्या शेतकरी भावांनो मायबहिणींनो / २५७