पान:माझ्या शेतकरी भावांनो आणि मायबहिणींनो... (Mazya Shetkari Bhavanno Mayabhaininno...).pdf/२४४

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

अध्यक्ष होते. त्यांना विचारले की, "एके वर्षी फ्रीसेल साखरेचा भाव जास्त असेल तर दुसऱ्या वर्षी लेव्ही साखरेचा भाव आपोआप कमी होतो हे तुम्हाला ठाऊक आहे?" ते म्हणाले, "नाही बुवा! आमच्या हे कोणी लक्षात आणूनच दिले नाही." पण, वेळोवेळी या सहकारमहर्षीनी शेतकऱ्यांना लुटण्यासाठी अशा वेगवेगळ्या युक्त्या वापरल्या; अजूनही त्या वापरणे सुरूच आहे.
 यावेळी शेतकऱ्यांची कोंडी करण्यासाठी कोणत्या युक्त्या वापरल्या पाहा. शरद पवारांनी दिल्लीत बसून साखरेची निर्यात बंद करण्याचे धोरण जाहीर केले. साखर निर्यात होणार नाही म्हणजे देशातील साखरेचे भाव कोसळणार आणि त्या कारणाने साखर कारखाने उसाला कमी भाव देणार अशी शेतकऱ्याची कोंडी झाली. तरी बरे, शेतकरी संघटनेच्या पराक्रमामुळे उसावरील झोनबंदी उठली; त्यामुळे अधिक दर देणाऱ्या कारखान्याला ऊस घालण्याची संधीतरी शिल्लक राहिली; पण शेतकरी अडला म्हणजे अधिक भाव देणाऱ्याचाही हात आखडता होतो. शेतीमंत्रालयाचे, शेतकऱ्यांची कोंडी करण्याचे दुसरे धोरण म्हणजे गुऱ्हाळबंदी. कारखाने चांगला भाव देत नाहीत तर मग आपणच गुऱ्हाळ मांडून गूळ बनविण्याचे शेतकऱ्याने ठरवले तर त्यावर बंदी. एकीकडे, शेतीमालावर प्रक्रिया करत नाही तर मग तुम्हाला कसा भाव मिळणार म्हणून सरकार ओरडत असते आणि दुसरीकडे गुऱ्हाळावर बंदी घालते असा हा दुटप्पीपणा आहे.
 ही ऊस परिषद निर्णय घेत आहे की ज्या शेतकऱ्यांना साखर कारखान्यांना ऊस न घालता स्वतःचे गुऱ्हाळ लावायचे असेल त्यांनी ते सरकारची गुऱ्हाबंदी मोडून अवश्य घालावे. सरकारला काय खटला लावायचा असेल तो लावू द्या. माझ्या परवानगीने तुम्ही हे गुऱ्हाळ लावले आहे म्हणून आरोपी क्रमांक एक म्हणून माझे नाव त्यात घाला. तुमचे गुऱ्हाळ बंद करायला कोणी आले तर, अगदी पोलिस बरोबर घेऊन आले तरी त्यांची सर्व माहिती लिहून ठेवा आणि त्यांना परतवून लावा; एवढ्याने ते ऐकत नसतील तर आपल्या घरात शिरलेले, गणवेशातील का असेना, चोरदरोडेखारे आहेत असे म्हणून आपल्या घरात शिरलेल्या दरोडेखोरांचे पारिपत्य करण्याचा जो अधिकार कायद्याने दिला आहे त्याचा वापर करून त्यांचे पारिपत्य करा. त्यामुळे जर तुम्हाला कोणी पकडले तर जबाबात सांगा की आम्ही हे शरद जोशींच्या सांगण्यावरून केले आहे त्यांना आरोपी नंबर एक करा.
 निर्यातीवर बंदी, गुऱ्हाळावर बंदी आणि उसाला भाव देणार फक्त ८६० रुपये टनाला; हा काय व्यवहार झाला? गेल्या वर्षी याच जागी उसाच्या भावासाठी आंदोलन करण्याचा निर्णय घेतला त्याप्रमाणे कोल्हापूर, सातारा, सांगली जिल्ह्यांतील

माझ्या शेतकरी भावांनो मायबहिणींनो / २४४