पान:माझ्या शेतकरी भावांनो आणि मायबहिणींनो... (Mazya Shetkari Bhavanno Mayabhaininno...).pdf/२४०

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

म्हणतात म्हणून शेतकऱ्यावर अन्याय करणारे धोरण आपण मांडत गेलात तर शेतकऱ्यांच्या आत्महत्यांसाठी केवळ मंत्री, प्रधानमंत्रीच नव्हे तर अधिकारीसुद्धा गुन्हेगार ठरतील.'
 यंदा पुन्हा एकदा दसरा येऊन ठेपला आहे. मराठ्यांची जुनी परंपरा आहे की दसऱ्यापर्यंत खरिपाची पिके एकदा हाताशी आली की त्या पिकांची लुटालूट करण्यासाठी टपलेल्या शत्रूवर चाल करून जायचे आणि त्यांचा बंदोबस्त करायचा. पुन्हा एकदा दसरा आला आहे आणि पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या फौजा जमा झाल्या आहेत. त्यांना फक्त पुढच्या लढाईचा आराखडा सांगायचा आहे.
 तो सांगण्याआधी मी शेतकऱ्यांना एका गोष्टीची आठवण करून देऊ इच्छितो. ढशवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी अफजलखानाच्या वधाची कथा फार चांगल्या रीतीने मांडली आहे. ती ऐकताना माझ्या असे लक्षात आले की इतिहास वाचणाऱ्या सगळ्या लोकांची कल्पना अशी की शिवाजी महाराज अफजलखानाच्या भेटीसाठी प्रतापगडाच्या पायथ्याशी गेले तेव्हा महाराजांच्या मनामध्ये अफजलखानाचे पारिपत्य करायचे एवढाच काय तो एकमेव विचार असावा. बाबासाहेब पुरंदऱ्यांनी साक्षीपुराव्यांनी दाखवून दिले आहे की शिवाजी महाराज प्रतापगडाच्या पायथ्याशी जायला निघण्यापूर्वी त्यांनी किमान तीन चढायांची योजना तयार केली होती. त्यात कोकणामधील सिद्दी जोहारावर फौज पाठविण्याची एक योजना आखली होती. शिवनेरीला खानाचा त्रास होत होता तिकडे फौज पाठविण्याची योजना होती आणि दक्षिणेकडेसुद्धा पन्हाळ्यापर्यंत कूच करण्याची तयारी करण्यात आली होती. शिवाजी महाराजांची राज्यकारणपटुता यातून लक्षात येते. समोर अफजलखान चालून येत आहे म्हटल्यामुळे भयभीत होऊन न जाता, अफजलखानाच्या भेटीसाठी भवानीमातेचा आशीर्वाद घेतला असला तरी, आपण या भेटीतून जिवंत परत येवो न येवो, या तीन मोहिमा झाल्या पाहिजेत अशी तयारी महाराजांनी केली होती.
 दसऱ्यानंतर आपण अफजलखानाला म्हणजे साखरसम्राटांना भेटायला जाणार आहोत; पण तेवढ्यानेच भागणार नाही. त्याखेरीज काही चढायांची कामे आपल्याला आखणे भाग आहे. यातील प्रत्येक चढाई तितकीच महत्त्वाची आहे. शेतकरी संघटना जर फक्त उसापुरती, फक्त कापसापुरती आणि फक्त महाराष्ट्रापुरतीच लढत आणि जिंकतही राहिली तरी आपल्याला अंतिम विजय मिळणे कठीण राहील. या दुसऱ्या लढायाही तितक्याच महत्त्वाच्या आहेत.
 विदर्भामध्ये शेतकरी मोठ्या संख्येने आत्महत्या करीत आहेत हे गंभीर आहे; पण त्याबरोबर आंध्रातील, कर्नाटकातील कापूस उत्पादक शेतकरी आत्महत्या

माझ्या शेतकरी भावांनो मायबहिणींनो / २४०