पान:माझ्या शेतकरी भावांनो आणि मायबहिणींनो... (Mazya Shetkari Bhavanno Mayabhaininno...).pdf/२२९

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

रुपये किलो भाव मिळावा म्हणून २३ दिवस रस्त्यावर बसलो होतो. पण २४व्या दिवशी मध्यरात्री पोलिसांनी तिथे येऊन आम्हा प्रमुख माणसांना अटक केली. अटक करायला हरकत नाही, पण तिथे बसलेल्या चाळीस हजारांवर शेतकरी स्त्री-पुरुषांना शांत ठेवण्याच्या दृष्टीने आम्हाला तिथेच ठेवा, दूर नेऊ नका अशी विनंती केली तरी त्यांनी आम्हाला दूर बल्लारीच्या तुरुंगात नेले. दुसऱ्या फळीच्या कार्यकर्त्यांच्या नेतृत्वाखाली रस्ता रोको चालूच होते. दुसऱ्या दिवशी म्हणजे ६ एप्रिल १९८१ रोजी काही बसगाड्या आणून आणखी काही सत्याग्रहींना अटक केली. सर्वांना अटक करून नेणे शक्य नाही हे शेतकऱ्यांना समजत होते आणि पोलिसांनाही. २३ दिवसांच्या सरावाने धीट झालेल्या शेतकऱ्यांनी आपला शांततामय सत्याग्रह सुरूच ठेवला होता. पण मग, भर मध्याह्नी पोलिसांनी शांतपणे बसलेल्या शेतकऱ्यांना पांगवण्यासाठी अश्रुधुराची नळकांडी फेकली, ती शेतकऱ्यांनी पोलिसांकडेच परतवली; मग थोडे लाठीमाराचे नाटक करून पोलिसांनी शांतपणे बसलेल्या, घामाचे दाम मागणाऱ्या त्या शेतकऱ्यांवर अंदाधुंद गोळीबार केला आणि अर्ध्या तासाच्या आत १२ शेतकरी भावांचे बळी घेतले.
 ५ एप्रिलला क्रांतिसिंह नाना पाटील यांचे जन्मगाव येडे मच्छिंद्र येथून निघालेली ही प्रचारयात्रा ६ एप्रिल रोजी निपाणी येथे तेथील हुतात्मा स्मारकाला वंदन करण्यासाठी गेली. शेतकरी हुतात्म्यांना श्रद्धांजली अर्पण करून आम्ही, सिनेमाच्या भाषेत बोलायचे तर, डोक्याला कफन बांधून या प्रचार यात्रेला निघालो आहोत. शेतीमालाला भाव मिळावा म्हणून जर का १२ शेतकऱ्यांनी या भूमीवर रक्त सांडले आहे तर शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्याकरिता त्यांच्या पायाची शपथ घेऊन आम्ही पुढे निघालो आहोत.
 निपाणीच्या हुतात्म्यांचे स्मरण, गेल्या दोन-तीन दिवसांत ऐकलेल्या काही शेतकऱ्यांच्या कर्जव्यथांच्या कैफियती या पार्श्वभूमीवर शेतकरी संघटनेच्या गेल्या पंचवीस वर्षांच्या विचारप्रवाहाचा आढावा घेणे उचित होईल.
 व्यासपीठावरून कैफियत मांडणारे आणि समोर बसून ऐकणारे – दोघांच्याही चेहऱ्यांवर दिसत होते की आपण कर्ज घेतले की चूक केली. काही चमत्कार होऊन - लॉटरी लागून म्हणा किंवा आणखी कोण्या मार्गाने - आपल्या हाती पैसे आले तर आधी हे कर्ज देऊन टाकू असेच जणू ते चेहरे बोलत होते. कोणाचे पैसे बुडवावे ही कोणाही सर्वसामान्य शेतकऱ्याची इच्छा असत नाही. ज्योतिबा फुल्यांनी म्हटले आहे की, 'शेतकरी हा अन्नदाता आहे. सगळ्या जगाची तो सेवा करतो; शेतीव्यतिरिक्त कारागिरी करून समाजाची सेवा करणारे बळिराजाकडे

माझ्या शेतकरी भावांनो मायबहिणींनो / २२९