पान:माझ्या शेतकरी भावांनो आणि मायबहिणींनो... (Mazya Shetkari Bhavanno Mayabhaininno...).pdf/२२७

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

बनले आहेत आणि त्याला फळे येऊ लागल्याचे हे उदाहरण आहे. शेतकऱ्यांचा आत्मविश्वास आता दृढ झाला आहे आणि शेतकऱ्यावर जर अन्याय झाला तर, शेपटीवर कोणी पाय दिल्यानंतर नाग जसा फणा काढून उभा राहतो तसा फणा काढून शेतकरी अन्यायकाला धडा शिकवण्याइतका सज्ज झाला आहे. याची भीती आता राजकारणातल्या सगळ्या लोकांना पडली आहे.
 येडे मच्छिंद्र येथे या प्रचारयात्रेचा प्रारंभ करण्यासाठी केलेल्या भाषणात मी नाना पाटलांच्या वेळची शेतकऱ्यांच्या कर्जाची परिस्थिती आणि आजची परिस्थिती यांची तुलना केली. जेव्हा नाना पाटलांनी शेतकऱ्यांना कर्जमुक्त करायचं ठरवले आणि त्यासाठी प्रतिसरकार स्थापन केल्याची घोषणा केली त्यावेळी आपल्या देशात सरकार होते गोऱ्या साहेबाचे म्हणजे परक्यांचे; बाहेरून व्यापाराकरिता आलेल्या आणि आपल्यावर राज्य करणाऱ्या ब्रिटिशांचे सरकार होते. त्यावेळी सावकाराच्या जाचापायी शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत नव्हत्या. शेतकऱ्यांनीच सावकारांचे कान नाक कापायला सुरुवात केली, त्यांच्या कर्जाच्या वह्या, कागदपत्रे, गहाणपत्रे जाळायला सुरुवात केली. तेव्हा इंग्रज सरकारने तीन महिन्यांत दक्षिणेतील शेतकऱ्यांसाठी एक आयोग नेमला आणि त्याबरोबरच सावकारी कर्जव्यवहारांतील व्याजखोरीला आणि जुलुमाला आळा घालण्यासाठी १९१८ साली युझुरिअस लोन्स् ॲक्ट (Usurious Loans Act) नावाचा कायदा केला. (युझुरिअस लोन म्हणजे कायद्याने ठरविलेल्या व्याजदरापेक्षा अधिक दराने दिलेले कर्ज). या कायद्यात पहिली तरतूद अशी होती की शेतकऱ्यांना दर साल दर शेकडा साडेपाचपेक्षा जास्त दराने व्याज लावता कामा नये. आज २००६ साली, दिल्लीतील आपल्याच देशातील लोकांनी चालविलेले, काँग्रेसच्या नेतृत्वाखालील सरकार शेतकऱ्यांच्या कर्जावरील व्याजाचा दर कमी करून ७ टक्क्यांवर आणल्याची घोषणा करून आपण शेतकऱ्यांवर मोठी मेहेरबानी केल्याचा डांगोरा पिटीत आहे. सरकारने ७ टक्के व्याजदाराची घोषणा केली असली तरी अजून काही त्याची अंमलबजावणी सुरू झालेली नाही. अजूनही सहकारी बँका १०, ११, १२,१४ टक्क्यांनी व्याज आकारणी करीतच आहेत. आमच्याच लोकांचे सरकार व्याज कमी करून ७ टक्क्यांवर आणण्याची नुसती घोषणाच करते, पण परक्या इंग्रजांच्या सरकारने शेतकऱ्यांना साडेपाच टक्क्यांच्यावर व्याज लावता कामा नये असा कायदा केला.
 इंग्रजांच्या त्या १९१८ सालच्या कायद्यात अशीही तरतूद आहे की शेतकऱ्यांच्या कर्जावर चक्रवाढ व्याज आकारता येणार नाही. चक्रवाढ व्याज म्हणजे काय

माझ्या शेतकरी भावांनो मायबहिणींनो / २२७