पान:माझ्या शेतकरी भावांनो आणि मायबहिणींनो... (Mazya Shetkari Bhavanno Mayabhaininno...).pdf/२२६

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

नाना पाटील काही असे हिंसक नव्हते. नानांचे सैनिक जुलमी सावकारांना आणि अधिकाऱ्यांना पकडून खुर्चीवर जखडून बांधीत आणि समोरच्या स्टूलावर त्यांचे पाय ठेवून त्यांच्या पायांच्या उघड्या तळव्यावर वेताच्या छडीने मार देत. या प्रकारालाच पत्र्या मारणे म्हणतात. नाना पाटलांच्या प्रति सरकारला, त्यामुळे काही लोक 'पत्री सरकार' म्हणून ओळखत. शेतकरी संघटनेची ही कर्जमुक्ती प्रचारयात्रा सावकारांना पत्र्या मारणाऱ्या नाना पाटलांच्या गावाहून सुरू होते आहे म्हणजे शेतकरी संघटनेचे कार्यकर्तेही बँकांच्या अधिकाऱ्यापदाधिकाऱ्यांच्या पायांना नाल ठोकणार की काय अशी या काही पत्रकारांना धास्ती होती. नाना पाटलांनी कोणाला नाल ठोकले नाही आणि शेतकरी संघटनेलाही तसे करण्याची जरूरी वाटत नाही आणि ती संघटनेची कार्यपद्धतीही नाही; पण सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे वाढलेल्या कर्जबाजारीपणाच्या बोजामुळे आत्महत्येच्या कड्याकडे ढकलला जाणारा शेतकरी, सरकार आपले चुकीचे धोरण बदलायला अजूनही तयार होत नाही हे लक्षात आल्यानंतर पुढे काय करील हेही सांगता येत नाही.
 कालपरवाच नाशिक जिल्ह्यात झालेला प्रकार या दृष्टीने पुरेसा बोलका आहे. नाशिक जिल्ह्याच्या देवळा तालुक्यातील विठेवाडी येथे केंद्रीय कृषिमंत्र्यांच्या उपस्थितीत शेतकरी मेळावा भरवला होता. नाशिक जिल्हा म्हणजे कांदा उत्पादक भाग. कांद्याचे भाव पार पडलेले आहेत. शेतकऱ्यांचे जाणते नेते आणि केंद्रीय कृषिमंत्री कांद्याच्या या परिस्थितीवर काही तोडगा काढतील या अपेक्षेने कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने या मेळाव्याला गेले. त्यात शेतकरी संघटनेचे सर्वसाधारण पाईकही होते. सभेतले सत्कार झाले, नेतेमंडळींचे स्वागत झाले, पोवाडे गायले गेले, एकेक मंत्र्यांची भाषणे होऊ लागली पण कांद्याच्या प्रश्नावर कोणीच बोलेनात आणि मग महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांचे जाणते नेते खुद्द कृषिमंत्रीही जेव्हा कांद्याचा प्रश्न डावलूनच बोलू लागले तेव्हा शेतकऱ्यांनी आपल्या या जाणत्या राजाची मोठी फजिती केली आणि त्यांना आपल्या लवाजम्यासहित पळ काढायला लावला. या ठिकाणी शेतकरी संघटनेचा कोणी मोठा नेता हजर नव्हता की आधी कोणी या शेतकऱ्यांना तशी दिशाही दिली नव्हती. या फटक्यामुळे पुढाऱ्यांच्या असे ध्यानात आले आहे की शेतकरी संघटना म्हणजे शरद जोशी किंवा शेतकरी संघटना म्हणजे सरोज काशीकर, वामनराव चटप असे चित्र राहिलेले नाही. गेली पंचवीस वर्षे शरद जोशी, सरोज काशीकर, वामनराव चटप आणि त्यांच्या सर्व ज्येष्ठ-कनिष्ठ सहकाऱ्यांनी महाराष्ट्रभरच्या शेतकऱ्यांच्या मनात ज्या स्वातंत्र्यबीजाची पेरणी केली त्यातून उगवलेल्या रोपट्यांचे आता वृक्ष

माझ्या शेतकरी भावांनो मायबहिणींनो / २२६