पान:माझ्या शेतकरी भावांनो आणि मायबहिणींनो... (Mazya Shetkari Bhavanno Mayabhaininno...).pdf/२१४

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

मी काय मागेन? त्यावर माझ्या मनात उत्तर येई की मी देवाला म्हणेन की, 'देवा, मला एवढीच भीक घाल की माझ्या आयुष्यात माझ्या हातून शेतकऱ्यांचं दुःख, थोडं का होई ना, कमी होऊ दे.' अशी भक्ती केली म्हणून शेतकऱ्यांनी जात पाहिली नाही, भाषा पाहिली नाही, जे काही मी त्यांना सांगितलं ते त्यांना पटलं आणि ते पटल्यांनतर त्यांनी मला भरभरून प्रतिसाद दिला - त्यांच्या पारंपरिक पुढाऱ्यांना भीक न घालता प्रतिसाद दिला.
 चाकणला पहिल्यांदा आम्ही भामनेरचा मोर्चा काढायचे ठरवले. जवळ जवळ चाळीसपन्नास किलोमीटर चालत जायचे होते. तीन-चार दिवस चालायला लागणार होते. चाकणचे पुढारी म्हणत, 'अरे, या ब्राह्मणाच्या मागे कोण येणार?' शंभरसुद्धा माणसे येणार नाहीत असे पैजा लावून ते म्हणत; पण ते चाळीसपन्नास किलोमीटरचे अंतर चालून जेव्हा चाकणला दहा हजार शेतकरी स्त्री-पुरुष आले तेव्हा त्या पुढाऱ्यांची वाचा बंद झाली.
 १० नोव्हेंबर १९८० ला नाशिकचे उसाचे आंदोलन बांधावरून रस्त्यावर आणि रेल्वेरूळांवर आणायचे ठरले. आंदोलन बांधावर होते तोपर्यंत पोलिसांना काही काम नव्हते. आंदोलन सुरू होण्याआधी जवळ जवळ पंधरा दिवस संपूर्ण नाशिक जिल्हा आम्ही पिंजून काढला होता. पण तरीही, ९ नोव्हेंबरला 'रेल रोको' ची घोषणा केल्या केल्या मनात धाकधूक सुरू झाली. आपण इतकं सर्वस्व पणाला लावून हा जुगार खेळलो आहे; पण ही माणसं आपलं ऐकतील की नाही कुणास ठाऊक. त्यात सगळ्या सीआयडी/एल् आय् बीच्या लोकांनी अहवाल दिला होता की, शरद जोशींच्या बरोबर कोणीही आमदार नाहीत, खासदार नाहीत, त्यांच्या आंदोलनाला काही प्रतिसाद मिळण्याची शक्यता नाही. माझ्या पोटात मोठा गोळा आला की, 'घरातल्या सगळ्या लोकांना - बायकोला, मुलींना - दुखवून मी घराच्या बाहेर पडलो आहे. अशा परिस्थितीत उद्या शेतकऱ्यांनी खरंच साथ दिली नाही तर आयुष्याला काय अर्थ राहणार आहे? रेल्वेच्या गाड्या थांबवण्याकरिता जर शेतकरी आले नाहीत तर त्याच गाडीच्या पुढे पडून मला आयुष्य संपवावे लागेल.' या विचाराने झोप येईना आणि रात्री तीन वाजता एक फोन आला. आमच्या एका मोठ्या सहकाऱ्यांचा फोन होता. ते म्हणाले, 'आम्ही २५ बैलगाड्या घेऊन रेल्वे रूळांच्या बाजूला येऊन थांबलेलो आहोत. सकाळी आठ वाजता रेल्वे अडवायची असा तुमचा आदेश असल्यामुळे आम्ही बाजूला बसलो आहोत; आताच बसायची परवानगी दिलीत तर आम्ही आताही रूळांवर बसायला तयार आहोत.' हा फोन आला आणि मी निश्चित झोपी गेलो ते सकाळी आठ वाजताच जाग आली.
 अशा किती घटना सांगाव्या?

माझ्या शेतकरी भावांनो मायबहिणींनो / २१४