पान:माझ्या शेतकरी भावांनो आणि मायबहिणींनो... (Mazya Shetkari Bhavanno Mayabhaininno...).pdf/२०५

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

फारसं काही आलं नाही. विदर्भ, मराठवाडा हे काँग्रेसचे कायमचे किल्ले. त्या ठिकाणी मात्र राष्ट्रीय लोकशाही आघाडीला ११ पैकी १० जागा विदर्भात आणि मराठवाड्यात ८ पैकी ६ जागा मिळाल्या. महाराष्ट्रात मिळालेल्या एकूण २८ जागांपैकी १८ जागा स्वतंत्र भारत पक्षाच्या पाठिंब्यामुळेच मिळाल्या असे शिवसेनेचे आणि भाजपाचे नेतेसुद्धा मान्य करतात. शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी त्या निवडणुकीत काम केले एवढेच नव्हे तर कोणतीही अपेक्षा न ठेवता काम केले. लोकसभेमध्ये आम्ही एकही जागा घेतली नाही. कोणताही मोबदला न घेता आमचे कार्यकर्ते धावले. घरची भाकरी खाऊन त्यांनी प्रचार केला. राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा एकही उमेदवार असा सापडणार नाही, जो म्हणेल की शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्याने माझ्याकडे येऊन धाब्यावर जेवण्याकरिता ५ रुपये मागितले. कोणी गाडी मागितली नाही आणि पिणेबिणे कार्यक्रम आमच्या छावणीत नाहीच, तो दुसऱ्या छावण्यांचा भाग आहे. अशा प्रकारे शेतकरी संघटनेच्या पाईकांनी काम केलं आणि म्हणून महाराष्ट्रात राष्ट्रीय लोकशाही आघाडीला निम्म्यापेक्षा जास्त जागा मिळाल्या.
 तेव्हासुद्धा मी खासदार म्हणून जायचं हे ठरलेलं नव्हतं. मी खासदार का झालो?
 अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान झाले नाहीत. आपल्या हाती सरकार नाही, सत्ता नाही. उलट्या बाजूला काँग्रेस आणि त्यांच्या बाजूने शेतकरी संघटनेच्या खुल्या अर्थव्यवस्थेच्या विचाराला शंभर टक्के विरोध करणारे समाजवादी आणि कम्युनिस्ट यांचं मत असं की शेतकऱ्यांना स्वातंत्र्य नको, त्यांना बंधनात घाला. शेतकऱ्यांच्या जमिनी काढून घेऊन त्या जमिनींचं वाटप करा, मजुरांकरिता कायदे करा, शेतकऱ्यांना रास्त भाव देण्याची गरज नाही असं म्हणणाऱ्या कम्युनिस्टांचं केंद्रातल्या सरकारला पाठबळ मिळालं. लोकसभेत कम्युनिस्टांचे ६३ खासदार आहेत आणि कोणी त्यांना नावं ठेवोत, कम्युनिस्ट मंडळी ही मोठी अभ्यासू आणि वादविवादकुशल असतात. प्रश्न असा पडला की यांना तोंड कोण देणार? ज्यांनी माझी राष्ट्रीय कृषि कार्यबलाच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली त्या अटलबिहारी वाजपेयींनी सूचना केली की या डाव्या लोकांशी शेतीप्रश्नासंबंधी सामना करायचा असेल तर तिथे शरद जोशी हवेत. तेव्हा, संसदेतील राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या संघामध्ये माझी निवड झाली ती याकरिता झाली. महाराष्ट्रभरच्या शेतकऱ्यांनी माझा जो सत्कार चालवला आहे तो काही मी खासदारकीची लढाई मारून आलो म्हणून नाही, तर चक्रव्यूह भेदून जाण्याकरिता अभिमन्यू निघाला तेव्हा सर्व पांडवांनी ओवाळलं तसंच तुम्ही मला ओवाळता आहात असं मी मानतो. कारण संसदेतील ६३ कम्युनिस्ट खासदारांनी रचलेल्या चक्रव्यूहाचा भेद करण्याकरिता मला पाठवण्यात आलं आहे.

माझ्या शेतकरी भावांनो मायबहिणींनो / २०५