पान:माझ्या शेतकरी भावांनो आणि मायबहिणींनो... (Mazya Shetkari Bhavanno Mayabhaininno...).pdf/१९८

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

लागलं तर काय करावं? ठिकठिकाणचे कार्यकर्ते माझ्याकडे सल्ला मागतात की, "काय करावं?'
 कायदा काय आहे? जर का एखादा पोलिस अधिकारी किंवा एखादा इन्स्पेक्टर तुमच्या घरी आला - अगदी गणवेशात आला आणि तुमच्या घरात येऊन चोरी करू लागला, तुमच्या घरातील लक्ष्मीला जर हात लावू लागला तर तो गणवेशात असूनसुद्धा पोलिस नसतो, इन्स्पेक्टर नसतो तर तो त्या गणवेशातला दरोडेखोर असतो आणि असा जर कोणी दरोडेखोर आपल्या घरात शिरला तर त्याचं कसं पारिपत्य करायचं त्याचं स्वातंत्र्य प्रत्येक नागरिकाला कायद्यानं दिलेलं आहे, भारतीय दंडसंहितेनं दिलेलं आहे. कोणी भामटा आपल्या घरी आला आणि काही वेडंवाकडं वागू लागला, वेडंवाकडं बोलू लागला, घरच्या मायबहिणींची अब्रू लुटू लागला तर आपण काय कोणा 'शरद जोशीं'ना परिषद भरवून सल्ला द्यायला सांगतो का?
 हे सरकार आता केवळ 'दारूडा नवरा' राहिलेलं नाही ते आता माथेफिरू सरकार झालं आहे.
 आजपर्यंत रास्ता रोको, ठिय्या आंदोलन, रेल रोको, गावबंदी अशी अनेक प्रकारची हत्यारं मी शेतकऱ्यांच्या हाती दिली. कामगार संप करतील, न्हावीसुद्धा संप करतील, शेतकरी काय करणार? असं लोक म्हणत होते. त्यावेळी मी नवीनवी हत्यारं शेतकऱ्यांच्या हाती दिली - अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी. आता शेतकऱ्यांनी अधिक प्रखर व्हायला हवे.
 वीज कनेक्शनसाठी पैसे भरलेत आणि वीज देत नाहीत? काय वाटेल ते करा आणि वीज जोडून घ्या. ती जोडल्यानंतर जर कोणी तोडायला आलं तर त्याचं काय करायचं? तुमच्या घरी जर का कोणी भामटा शिरला आणि घरच्या लक्ष्मीला जर हात लावू लागला तर तुम्ही तिची अब्रू सांभाळण्यासाठी जे कराल तेच करा. शेतकरी हा ताठ मानेचा आहे, भेकड नाही असा जर का तुमचा लौकिक तयार झाला की मग कोणीही साखर कारखानदार, कोणीही मुख्यमंत्री, कोणीही पंतप्रधान तुम्हाला हात लावायला येणार नाही; पण याबाबतीत जर का आपण माघार घेतली, 'शरद जोशींनी सांगितलं खरं पण कुणी पडावं या फंदात, त्यापेक्षा साखर कारखानदाराच्या घरी जाऊ या, त्याचे बूट थोडे पुसू या म्हणजे मग तो आपल्या पोराला नोकरी लावून देईल, जाऊ द्या न मिळे ना का वीज, आपला वशिला तर लागून जाईल' असा विचार केला तर आपण शिवाजी महाराजांचं नाव घ्यायच्या लायकीचे राहणार नाही. जर का ताठ मानेने जगायचं असेल तर ताठ मानेनं जगायचं ठरवावं लागेल; पण जगायचं मेंढरासारखं

माझ्या शेतकरी भावांनो मायबहिणींनो / १९८