पान:माझ्या शेतकरी भावांनो आणि मायबहिणींनो... (Mazya Shetkari Bhavanno Mayabhaininno...).pdf/१८९

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

सांगितले - फक्त शेतकऱ्यांना नाही - की सरकार नावाच्या गोष्टीला एक पैसासुद्धा देऊ नका. कारण, सरकार हे दारूड्या नवऱ्याप्रमाणे झाले आहे. दारूड्या नवरा कामधाम काहीच करीत नाही. त्याची बायको बिचारी काबाडकष्ट करून मुलाबाळांना जगवण्याची धडपड करते, कसेबसे घर चालवायचा प्रयत्न करते. नवरा मात्र तलफ आली की बाहेर जाऊन कुठून कुठून पैसे जमवतो, त्याची दारू पितो आणि घरी येऊन वर बायकोपोरांना मारतो. या दारूड्या नवऱ्याला जर का बायकोने पैसे दिले तर तो आणखी दारू पिईल, बायकोपोरांना आणखी मारील. तेव्हा शहाणी बायको दारूड्या नवऱ्याच्या हाती एकही पैसा देत नाही. तसेच, आपल्या देशातले सरकार आहे. त्याला एक रुपया दिला तर त्यातले सत्तर पैसे तो सरकारी नोकरांना देतो - जे काहीही काम करीत नाहीत, काम करायचे म्हटले तर लगेच हात पुढे करतात; कामे होण्यापेक्षा कामे खोळंबून कशी राहतील अशीच धडपड करतात. म्हणजे तुम्ही दिलेल्या रुपयातील सत्तर पैसे देश बुडविणाऱ्या लोकांना देणारे सरकार हे दारूड्या नवऱ्यासारखेच आहे. तेव्हा यापुढे या दारूड्या नवऱ्याला एक पैसाही देऊ नका. बँकांची कर्जे देऊ नका, विजेची बिले देऊ नका, कोणतेही कर देऊ नका, सेस भरू नका. हा कार्यक्रम कठोरपणे राबवला तरच देश सुधारायची आशा आहे.
 ही तीन औषधे दरवाजावर उभ्या राहिलेल्या आजारांसाठी झाली. पण तेवढ्याने प्रश्न सुटत नाही. आता याच्यापुढे सरकारपुढे जाऊन 'आम्हाला एक क्विंटल धान्य पिकवायला १२०० रुपये खर्च येतो आणि मिळतात फक्त ५४० तर उरलेले ६६० रुपये द्या' म्हणून मागणी केली, तर सरकार म्हणेल वरचे ६६० रुपये कसले मागता, यंदा आम्ही गेल्या वर्षीपेक्षा ६० रुपये कमीच देणार आहोत. ही नुसती कल्पना नाही. गव्हाच्या बाबतीत हे घडते आहे. खरोखरी, पुढच्या वर्षी धानाला ५०० रुपयेसुद्धा भाव मिळणार नाही ही शक्यता लक्षात ठेवूनच पुढची आखणी करायला हवी.
 १२०० रुपये खर्चायचे आणि ५०० रुपये मिळवायचे या घाट्याच्या धंद्यातून मार्ग कसा काढायचा? माझा उपाय असा की आम्हाला आता सरकार नकोच. शेतकरी संघटनेच्या आधीच्या घोषणेत 'हवे घामाचे दाम' असे शब्द होते, आता 'घेऊ घामाचे दाम' असे आहेत. तेव्हा शेतीमालाचे भाव 'घेण्यासाठी काय करायचे हे आपणच ठरवायला हवे, ते सरकारचे काम नाही. आपल्याला आता अशी व्यवस्था करायला हवी की आमची जमीन, आमची माणसे, जरूर भासल्यास कर्ज गोळा करून आमचे भांडवल आणि चांगल्यात चांगले बियाणे, चांगल्यात चांगले पीक, चांगल्यात चांगले उत्पादन काढून खर्च करू, तयार झालेला माल

माझ्या शेतकरी भावांनो मायबहिणींनो / १८९