पान:माझ्या शेतकरी भावांनो आणि मायबहिणींनो... (Mazya Shetkari Bhavanno Mayabhaininno...).pdf/१८५

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

आणि सरकारी धान्य महामंडळाचे लोक म्हणायला लागले की हे धान काही आम्ही विकत घेणार नाही, घेतले तर कमी भावात घेऊ. कारण, हे धान मोडके आहे, सडके आहे, डागाळलेले आहे. आम्ही त्या सरकारी अधिकाऱ्यांशी बोलणी केली. 'वरच्या तुसाला डाग आहे; पण आतल्या दाण्याला काही डाग नाही. रेशनिंगसाठी धान भरडून तांदूळच देणार आहात तेव्हा डागाचा काही प्रश्न नाही.' असे म्हटल्यावर त्यांनी आणखी सबब सांगितली की दाणा मोडका आहे. मग आम्ही पंजाबमधील कृषी विद्यापीठाच्या तज्ज्ञांना बोलावून त्यांच्याकडून धानाची तपासणी केली. ते म्हणाले, "हा तांदूळ संपूर्ण चोख नाही, खराब आहे; पण पाचदहा टक्केच खराब आहे. एवढं चालतं." मग आम्ही पानिपतला धानाच्या शेतकऱ्यांची परिषद घेतली आणि तेथील मंचावरून मी घोषणा केली, की सरकार जोपर्यंत आमचे हे धान खरेदी करीत नाही तोपर्यंत यापुढे हरियाणा आणि पंजाबमध्ये रस्त्यावर वाहने चालणार नाहीत. दोन्ही राज्यांमध्ये रास्ता रोको असा करू' आणि वेळही न घालवता परिषदेच्या ठिकाणाजवळच दिल्लीकडून अंबाल्याला जाणारा 'ग्रँट ट्रंक रोड' नावाचा इतिहासप्रसिद्ध रस्ता सभा संपल्याबरोबर परिषदेला आलेल्या सर्व किसानांनी अडवला. मॅजिस्ट्रेट आले, पोलिस आले; पण त्यांची थोडी पंचाईत झाली. नुसतेच शेतकरी असते तर त्यांनी पकडापकडी, पांगवापांगवी केली असती; पण मंत्रिपदाच्या पातळीवरील मी दिल्लीहून येऊन आंदोलनात बसलो होतो आणि अशा प्रसंगी अशा व्यक्तीवर काय कारवाई करावी याबद्दल पोलिसांच्या पुस्तकात कुठे काही लिहिलेले नाही. ३ ऑक्टोबरला मी दिल्लीला माझ्या कार्यालयात गेलो आणि भारतीय अन्नमहामंडळाच्या अधिकाऱ्यांना बोलावून घेतले आणि त्यांना विचारले, 'धान खरेदी करण्यात तुमची अडचण काय आहे?' त्यांनी हे धान खरेदी केले तर कसे नुकसान होईल वगैरे सांगितले. मी विचारले, 'किती नुकसान होण्याची शक्यता आहे?' ते म्हणाले, 'तीनशे कोटी रुपये!' मी त्यांना म्हटले, "सरकारी नोकरांना पाचवा वेतन आयोग लागू करताना तीन हजार कोटी रुपये उधळायला सरकारला काही वाटत नाही आणि धानाच्या शेतकऱ्यांनी घाम गाळून पिकवलेल्या धानावर तीनशे कोटी रुपयांची खोट घ्यायला तुम्हाला जड जाते?" दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रात बातम्या आल्या की सरकारने तीनशे कोटी रुपये मंजूर केले आहेत आणि धानाची खरेदी चालू केली आहे.
 धानाची लढाई द्यायची असेल तर महाराष्ट्रातील धानउत्पादकांनी महाराष्ट्रात द्यायची आणि हरियाणातील किसानांनी हरियाणात द्यायची असे करून चालणार नाही. धान सगळ्या हिंदुस्थानभर पिकते, तेव्हा धानाची ही लढाई सगळ्या

माझ्या शेतकरी भावांनो मायबहिणींनो / १८५