पान:माझ्या शेतकरी भावांनो आणि मायबहिणींनो... (Mazya Shetkari Bhavanno Mayabhaininno...).pdf/१८१

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.



सरकारला वगळून शेती हाच पर्याय



 शेतकरी संघटनेची सुरुवात झाल्याला २५ वर्षे लवकरच पुरी होतील आणि आज या धानउत्पादक शेतकऱ्यांसमोर बोलताना मला वाटायला लागले आहे की संघटनेच्या सुरुवातीच्या दिवसात जे वातावरण तयार झाले होते ते पुन्हा एकदा येथे तयार होते आहे.
 या परिषदेच्या निमित्ताने सर्व कार्यकर्ते जिल्ह्याजिल्ह्यांत, गावागावांत फिरत होते. त्यांच्यापैकी अनेकांना एक प्रश्न हटकून विचारण्यात आला की, 'शेतकरी संघटनेला आताच कुठे धान-शेतकऱ्यांची आठवण आली? इतके दिवस शरद जोशी कोठे गेले होते?'
 हा प्रश्न महाराष्ट्रातील अत्यंत लोकप्रिय प्रश्न आहे. येवला-लासलगाव येथे कांद्याचे भाव पडले की मान्यवर वृत्तपत्रांचे संपादकसुद्धा संपादकीयात लिहितात, 'कांद्याचे भाव पडले, शेतकऱ्यांच्या डोळ्याला पाणी आले, आता शरद जोशी कोठे आहेत? शेतकरी संघटना काय करते आहे?' म्हणजे जणू काही, कांद्याचे भाव पडले म्हणजे काहीतरी केलेच पाहिजे आणि तेही शरद जोशींनीच केले पाहिजे, दुसऱ्या कोणी केलेले चालणार नाही! शेतकऱ्यांनी अशी अपेक्षा व्यक्त केली तर ती प्रेमाची असेल; पण कांद्याचे भाव वाढू लागले आणि पंचतारांकित ग्रहकांच्या डोळ्याला पाणी आले म्हणून शेतकऱ्यांच्या नावाने 'टाटाबिर्ला' अशी भाषा वापरणारांनी असे प्रश्न विचारले तर त्यात खोडसाळपणाखेरीज आणखी काय असणार?
 धानाच्या बाबतीत मी उशीर केला असे ऐकायला आले तरी मला फार वाईट वाटते. मी आंदोलने अनेक केली. उसाचे आंदोलन खूप मोठे झाले, जगभर गाजले पण माझ्या शेतामध्ये उसाचे एक कांडूकही पिकत नाही. कापसाच्या आंदोलनात मी चौदा वेळा तुरुंगात गेलो पण माझ्या वावरात वातीइतकाहीसुद्धा कापूस पिकत नाही. मी आंबेठाणचा शेतकरी, म्हणजे मावळातला. मावळाचा

माझ्या शेतकरी भावांनो मायबहिणींनो / १८१