पान:माझ्या शेतकरी भावांनो आणि मायबहिणींनो... (Mazya Shetkari Bhavanno Mayabhaininno...).pdf/१७९

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

दरवर्षी शेतकऱ्यांना उणे सबसिडीच्या माध्यमातून हजारो कोटी रुपयांनी लुबाडीत आले आहे याचा कबुलीजबाब सरकारने दिला असूनही बँकांचे अधिकारी शेतकऱ्यांकडील किरकोळ कर्जाच्या वसुलीसाठी शेतकऱ्यांच्या घरी जाऊन जप्ती करीत आहेत त्याची बेइज्जती करीत आहेत. यावर काय उपाय करायचा? तुमच्या घरी येऊन कोणी तुमच्या लक्ष्मीला जर हात लावायला लागला तर तुम्ही काय पंचायतीत जाऊन विचारीत नाही, आता काय करू म्हणून! बँकेचे अधिकारी असोत, वीज मंडळाची माणसे असोत का पोलिसही असोत; सरकारी नोकर जोपर्यंत तो कायदेशीर काम सनदशीर मार्गाने करीत असतो तोपर्यंतच सरकारी नोकर असतो. वर्दी घालून एखादा पोलिस तुमच्या घरी आला आणि चोरी करू लागला तर तो पोलिस नसतो, तो वर्दी घातलेला चोर असतो आणि नागरिकांना स्वसंरक्षणाचा हक्क कायद्याने दिला आहे. तेव्हा, कोणीही सरकारी अधिकारी किंवा पोलिस तुमच्या घरी येऊन बेकायदेशीरपणे काही कारवाई करू लागला तर त्याला सरकारी वर्दीतील चोर-दरोडेखोर समजून कायद्याने दिलेले स्वसंरक्षणाचे हत्यार वापरा आणि या नगराचे 'क्रांतिवीर नाना पाटीलनगर' हे नाव सार्थ करा.
 समारोप
 या अधिवेशनात स्वातंत्र्याचा उद्घोष झाला आहे. शेतीचा शोध लागल्यापासून शेतकऱ्यांच्या माथी बसलेला शोषणाचा बोजा दूर होण्याची वेळ येऊन ठेपली आहे, ही संधी हुकविण्यासाठी स्वातंत्र्यसूर्याला घाबरणारी घुबडे नाना तऱ्हेने घुत्कार करून तुमच्याही मनात भीती भरविण्याचा प्रयत्न करू लागतील. तिकडे लक्ष न देता या अधिवेशनाच्या निमित्ताने एकत्र आलेले जोतिबा फुल्यांचा स्वातंत्र्याचा विचार आणि नाना पाटलांची ताकद यांचा योग्य मेळ घालून यापुढे वागू लागलो तर जगातील कोणतीही राक्षसी ताकद आपल्या स्वातंत्र्याच्या आड येऊ शकणार नाही.
 सारांश
 बऱ्याच दिवसांपासून सरकारे दिवाळखोरीत निघाली आहेत, आपल्या नोकरांचे पगार भागविण्याइतकेही पैसे त्याच्याकडे नाहीत. त्यांच्याकडे शंभर रुपये जमा झाले तर त्यातील सत्तर रुपये नोकरांचे पगार देण्यातच जातात. अशा प्रकारचे सरकार देशाचे काही भले करू शकत नाही. तेव्हा, एखाद्या दारूड्याच्या कारभारणीची जी अवस्था होते तीच अवस्था आज आपली झाली आहे. कारभारणीने आपले दागिने उतरवून दिले तरी त्याची तो दारूच पिणार, त्याचे व्यसन वाढतच राहणार; त्याच्यात काही सुधारणा होणार नाही आणि घरातही काही सुधारणा होणार नाही. त्यामुळे माझ्या मते, प्रत्येक दारूड्याच्या कारभारणीने आपल्या

माझ्या शेतकरी भावांनो मायबहिणींनो / १७९