पान:माझ्या शेतकरी भावांनो आणि मायबहिणींनो... (Mazya Shetkari Bhavanno Mayabhaininno...).pdf/१७६

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.


 जिंकण्याची खात्री
 या लढाईत उतरणार म्हणजे काही आम्ही राजपुतांसारखे केसरिया-जोहार करून बलिदानाची लढाई करणार नाही. ही लढाई लढून आम्ही जिंकणार आहोत याची आम्हाला खात्री आहे. कारण, शेतीला जे जे काही लागते त्यातील मुबलक सूर्यप्रकाश आमच्या बाजूने आहे, गंगायमुनेपासून कृष्णाकावेरीपर्यंतच्या सगळ्या वाहत्या नद्यांचे पाणी आमच्या बाजूने आहे आणि आमच्याकडील माणूस चाळीसपन्नास रुपये मजुरीवरसुद्धा आनंदाने कामे करतात, शेतकऱ्याच्या घरची माणसेही मजुरीचा विचार न करता कामे करतात म्हणजे आमच्याकडे कार्यक्षम मनुष्यबळ उदंड आहे. नेदर्लंडमध्ये फुलांच्या शेतीत काम करणाऱ्या माणसाला दिवसाला २००० रुपये मजुरी आहे, त्या तुलनेत आमच्याकडील मनुष्यबळ स्वस्तही आहे. या सर्व जमेच्या बाजू लक्षात घेतल्या तर या जगात अशी कोणतीही ताकद नाही जी आमच्याशी टक्कर देऊ शकेल. फक्त, आमचे हे जे फायदे आहेत ते चांगल्या तऱ्हेने वापरण्याचे आम्हाला स्वातंत्र्य पाहिजे. तेव्हा, यापुढे गुलामगिरी करणार नाही हा आपला पहिला ठराव झाला.
 लढ्याची रणनीती
 हा ठराव अमलात आणायचा म्हटले तर बंदिस्त व्यवस्थेतील लाभांना सोकावलेले घटक आपल्याला तसे सुखासुखी करू देणार नाहीत. त्यासाठी आधी लढावे लागेल. या लढ्याची रणनीती या ठरावात मांडायची आहे.
 १. आम्ही आता स्वतंत्र झालो आहोत. शेती कशी करायची याची आम्हाला अक्कल आहे. आम्हाला दिल्लीच्या कृषिभवनाची गरज नाही आणि मुंबईतील कृषिमंत्र्यांचीही गरज नाही.शेतीतून सरकारचे उच्चाटन करा.
 २. संपूर्ण जग बाजारपेठ म्हणून एक होते आहे. युरोपमधील सर्व देशांनी, जे दुसऱ्या महायुद्धात एकमेकांविरुद्ध लढले त्यांनी एकत्र येऊन एक सामूहिक बाजारपेठ तयार केली आणि हिंदुस्थानात या राज्यातला माल त्या राज्यात जाऊ देत नाहीत, जाऊ दिला तर त्यात शेकडो अडथळे आणतात. हे आता चालायचे नाही. शेतीमालाच्या व्यापारासाठीहिंदुस्थान ही एक बाजारपेठ, सामूहिक बाजारपेठ व्हावी. कोणताही शेतीमाल हिंदुस्थानातील एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत विनाअडथळा नेता आला पाहिजे.
 ३. शेतीमालाच्या वाहतुकीवर बंधने लादताना 'जीवनावश्यक वस्तू कायद्याचे निमित्त पुढे केले जाते. हा कायदा त्वरित रद्द करण्यात यावा.
 ४. खरे तर, पन्नास वर्षे सातत्याने शेतकऱ्यांची लूट करणाऱ्या इंडिया शासनाने आपल्या चुकीच्या धोरणामुळे देश बुडतो आहे याची दखल घेऊन

माझ्या शेतकरी भावांनो मायबहिणींनो / १७६