पान:माझ्या शेतकरी भावांनो आणि मायबहिणींनो... (Mazya Shetkari Bhavanno Mayabhaininno...).pdf/१७४

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

अशा मथळ्याखाली त्यांनी त्यावर अग्रलेख लिहिला आहे. तेव्हा, आपली लुटालुटीची व्यवस्था बिघडू नये म्हणून या मंडळींनी 'राष्ट्रवादी' म्हणून छान नाव घेऊन चळवळ उभी केली; इंग्रजांचे जे जे काही असेल ते वाईटच आहे असे जनतेच्या मनात भरायला सुरुवात केली. म्हणजे, 'चांगले असेल तेसुद्धा घ्यायचे नाही' याला 'राष्ट्रवाद' म्हणायचे! जोतिबा फुल्यांनी इशारा दिला होता की माझी मांडणी बाजूला ठेवून जर स्वातंत्र्याची चळवळ चालवली तर स्वातंत्र्य येईल, पण ते खरे स्वातंत्र्य असणार नाही, ती पुन्हा 'पेशवाई'च असेल.
 आणि १९४७ साली जे स्वातंत्र्य आले ते पेशवाईचे आले आणि त्यांनी 'समाजवादा'चा नवा टिळा लावला आणि आपणही इंग्रज गेल्याच्या आनंदात त्या समाजवादाला पार भुलून गेलो. एकदा आपण 'राष्ट्रवादा'च्या नावाने फसलो आणि एकदा 'समाजवादा'च्या नावाने फसलो आणि शेतकऱ्याच्या सर्व शत्रूंनी शेतकऱ्याचा जगाशी संपर्क येऊ दिला नाही. शेतकऱ्याला शहाणा होऊ द्यायचे नाही, बाकी त्या काहीही मागावे!
 दुतोंडी स्वदेशी
 आता समाजवादाचा जागतिक पाडाव झाल्यानंतर शेतकऱ्यांचे शत्रू नवीन, 'स्वदेशी' नावाची युक्ती घेऊन पुढे आले आहेत. ते म्हणतात, 'तुम्ही आंबे परदेशात पाठवले तर आम्हाला चांगले आंबे खायला मिळणार नाहीत' उलट, चांगली चांगली फळे परदेशातून आणली तर हेच स्वदेशीवाले ओरड करतात की, 'आमच्या शेतकऱ्यांचे काय होणार?' 'ओली पडो का सुकी पडो' आपल्याला फुकटात राबायला मिळालेला शेतकरी स्वतंत्र होता कामा नये, तो गुलामच राहिला पाहिजे असे ज्यांना वाटते ती मंडळी आता स्वदेशीचा झेंडा हातात घेऊन आणि वाटेल त्या भाकड कथा सांगून शेतकऱ्यांना घाबरवायचा प्रयत्न करीत आहेत.
 अधिवेशनाचे निर्णय
 या सर्व पार्श्वभूमीवर येथे प्रचंड संख्येने जमलेल्या शेतकरी स्त्रीपुरुषांनी या अधिवेशनात महत्त्वाचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. मुळात पश्चिम महाराष्ट्रात इतक्या मोठ्या संख्येने शेतकरी स्वातंत्र्याचा उद्घोष करायला जमतात हीच मोठी ऐतिहासिक घटना आहे. कारण,येथील सहकार सम्राटांनी इतके दहशतीचे वातावरण तयार केले होते की धीर बांधून कोणी शेतकरी संघटनेच्या सभेला हजर राहिले तर त्यांची यादी सभा संपायच्या आत एखाद्या डायरेक्टरच्या हाती पडायची. त्यामुळे वीस वर्षांपूर्वी या भागात शेतकरी संघटनेची एखादी सभा घेणे मोठे मुश्किलीचे काम होते. म्हणूनच ही उपस्थितीही ऐतिहासिक आहे.

माझ्या शेतकरी भावांनो मायबहिणींनो / १७४