पान:माझ्या शेतकरी भावांनो आणि मायबहिणींनो... (Mazya Shetkari Bhavanno Mayabhaininno...).pdf/१७३

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

म्हणून मग दिल्लीत एक किमान वेतन मंत्रालय उघडा अशी सूचना केली जाते. काम होत नसेल तर सरकार कमी करण्याऐवजी सरकार वाढविण्याचा खटाटोप जगभर चालत राहिला. आता ते संपले आहे. समाजवाद संपला आणि समाजवादाचे नारे देणाऱ्या रशियाचा बट्ट्याबोळ झाला. आता 'सरकारचा हस्तक्षेप जितका कमी तितके चांगले' असे आपले तत्त्व मान्यता पावले आहे.
 शेळी आणि कसाई
 शेतकरी आणि उद्योजक, इतके दिवस गुलामीत ठेवलेले, आता त्या गुलामीतून सुटू लागल्यावर गुलामीत ठेवणाऱ्यांना गोड नक्कीच वाटणार नाही. शेतकरी आणि सरकार यांच्यामधील नाते स्पष्ट करताना मी नेहमी 'शेतकरी हा शेळी आहे आणि सरकार कसाई आहे' अशी उपमा वापरतो. शेळीला वाटते हा आपल्याला चारा घालतो, पाणी देतो, निवाऱ्याला ठेवतो; गळ्यात दोरी घालून फिरवत असला तरी बरा गोड मालक आहे. हा कसाई प्रेम दाखवीत होता, सूट देत होता, सब्सिडी देत होता ते कशाकरिता हे शेळीला शेवटच्या दिवसापर्यंत कळत नाही. ज्या दिवशी कापायची आहे त्या दिवशी जास्तीत जास्त मांस मिळावे यासाठी हे प्रेम होते हे शेळीला फक्त शेवटच्या दिवशी कळते. शेळी जर कसायला म्हणाली की, 'तुला खायला हवे तर मला का मारतो; तुला काय कोबी मिळत नाही का बटाटे मिळत नाही?' कसाई त्यावर म्हणतो, 'कोबी, बटाटे खूप मिळतील, पण तुला मारल्याखेरीज माझा धंदा होणार नाही.' एखादी संधी साधून शेळी पळून जाऊ लागली तर कसाई तिला तसे पळू देणार नाही, धरून आणून परत बांधून ठेवील. त्याचप्रमाणे जोतिबा फुल्यांच्या काळापासून ज्यांनी शेतकऱ्यांना गुलाम केले त्या मंडळींनी नव्या नव्या युक्त्या लढवून शेतकऱ्यांना बंदिस्त व्यवस्थेत अडकवून ठेवण्याच्या कारवाया केल्या. यावेळी त्यांनी आणखी नव्या युक्त्या काढायला सुरुवात केली आहे.
 कसायांच्या युक्त्या
 त्यांच्या या युक्त्यांकडे बारकाईने लक्ष ठेवायला पाहिजे. कारण स्वातंत्र्याची ही लढाई मोठी अटीतटीची आहे. जोतिबा फुल्यांनी म्हटले, इंग्रज आला हे चांगलेही झाले; काही तरी शिकू या त्यांच्याकडून. राष्ट्रवादी म्हणायला लागले काही शिकायला वगैरे नको. 'मुलीचे लग्न लहान वयात करू नये' असा कायदा करायचे सरकारने ठरवले तेव्हा त्यावेळचे स्वदेशीवाले लोकमान्य टिळक म्हणाले, 'कायदा चांगला आहे, पण सरकारला जर असा कायदा करायला आपण मान्यता दिली तर सरकारला आपल्या सामाजिक जीवनात हस्तक्षेप करण्याची सवय होईल.' 'म्हातारी मेल्याचे दुःख नाही, पण काळ सोकावतो'

माझ्या शेतकरी भावांनो मायबहिणींनो / १७३