पान:माझ्या शेतकरी भावांनो आणि मायबहिणींनो... (Mazya Shetkari Bhavanno Mayabhaininno...).pdf/१६१

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

सब्सिडीची गरज नाही; आम्ही शिवारातून बाजारात जाताना आम्हाला जे वाटेत लुटता ते लुटणं बंद करा, बाजार मोकळे करा, बाजारात जी किंमत मिळेल ती फक्त आम्हाला मान्य असेल, बाजारात किंमत ठरवताना सरकारने हात घातलेला असता कामा नये." गेली वीस वर्षे आपण अशी मागणी करीत आहोत.
 आपल्या या मागणीचा, समाजवादी नियोजनव्यवस्थेच्या पतनाच्या रूपाने, जगभर विजय झाला; पण आपली भारतीय शेतकऱ्यांची अवस्था अशी झाली आहे की 'दात होते तेव्हा चणे नव्हते आणि आता चणे मिळताहेत पण दात नाहीत!' सगळ्या भारतातील शेतकऱ्यांची परिस्थिती आज अतिशय विचित्र झाली आहे. आतापर्यंत भारतातील शेतकऱ्यांच्या उत्पादनाचे भाव जगातील शेतकऱ्यांच्या उत्पादनांच्या भावांपेक्षा कमी होते; म्हणजे, हिंदुस्थान सरकार शेतकऱ्यांना उणे सबसिडी देत होते. आता, जगात नवीन तंत्रज्ञानाच्या आधाराने शेती होऊ लागल्याने इतिहासात पहिल्यांदा असे घडते आहे की भारतातील शेतीमालाचे भाव जगातील इतर देशातील शेतकऱ्यांच्या शेतीमालांच्या भावांपेक्षा जास्त होऊ लागले आहेत. न्यूझीलंडमधील शेतकऱ्याला त्यांच्याकडील उत्कृष्ट प्रतीची सफरचंदे हिंदुस्थानातील बाजारात आणून विकणे शक्य होत आहे आणि आपल्याकडील सफरचंदे त्यांच्याशी स्पर्धा करू शकत नाहीत. परदेशात कपाशीची उत्पादकता वाढली, प्रत सुधारली, खर्च कमी झाला. हा कापूस जर का हिंदुस्थानात येऊ लागला तर येथील कापूसउत्पादकांची परिस्थिती अधिकच बिकट होईल. म्हणजे, आम्ही जी खुली बाजारपेठ मागत होतो ती येते आहे, पण त्या खुल्या बाजारपेठेच्या स्पर्धेत आम्ही भाग घेऊ शकत नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
 या स्पर्धेत आम्ही भाग घेऊ शकत नाही याला काही अडचणी कारणीभूत आहे. या अडचणी कायमच्या नाहीत, तात्पुरत्या आहेत, दूर करता येण्याजोग्या आहेत. आपल्या देशात सूर्यप्रकाश नसता तर ती कायमची अडचण झाली असती, आपल्या देशात पाणी कमी असतं तर ती कायमची अडचण झाली असती, आपल्या देशातील शेतकरी बिनडोक असता तर ती कायमची अडचण झाली असती; पण ज्या देशात सूर्यप्रकाश अमाप आहे, ज्या देशातील अनेक नद्या पाण्याने भरभरून वाहत आहेत आणि ज्या देशातील शेतकऱ्यांनी इतकं शोषण सोसूनसुद्धा देशाला अन्नधान्याच्या बाबतीत स्वावलंबी केलं त्या देशाला कायमची अडचण कोणतीही असू शकत नाही. अखेरचा विजय हा हिंदुस्थानच्या शेतकऱ्याचाच होणार आहे.खुल्या बाजारपेठेचं तत्त्वज्ञान आणि भारतीय शेतकऱ्याचं सामर्थ्य यांचा मिलाफ एक दिवस होणार आहे. तो दिवस येईपर्यंत काही काळ

माझ्या शेतकरी भावांनो मायबहिणींनो / १६१