पान:माझ्या शेतकरी भावांनो आणि मायबहिणींनो... (Mazya Shetkari Bhavanno Mayabhaininno...).pdf/१६०

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

सूर्यफूलबी यांची हीच परिस्थिती आहे. मी त्या सरकारबरोबर कृषिकार्यदलाचं काम करतो म्हणून त्यांच्या धोरणाची वाखाणणी करण्याचं काही कारण नाही. युद्धात काही लोक सैन्यात राहून काम करतात, काहींना तुरुंगात जाऊन काम करावं लागतं तसं मी कृषिकार्यदलाचा अध्यक्ष होऊन शेतकरी संघटनेचा पाईक म्हणूनच काम करीत आहे. तेव्हा आपला जो सटाण्याचा ठराव आहे – "शेतकरी आंदोलन अधिक प्रभावी होईल अशा प्रकारचं धोरणं त्या त्या वेळची परिस्थिती पाहून ठरवावं." त्यानुसार या अधिवेशनात पुढील काळासाठी राजकीय धोरण ठरवावं लागेल. हे ठरवत असताना शेतकरी संघटनेची ताकद काय आहे याचाही आढावा घ्यावा लागेल. आजच्या बैठकीत वेगवेगळ्या भागातील कार्यकर्त्यांनी जो आढावा घेतला त्यावरून, कोणी कितीही म्हणत असले की शेतकरी संघटना संपली तरी विदर्भातील नागपूर, यवतमाळ, अमरावती, चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये आणि सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये पूर्वीच्या काळीही जितक्या उत्साहाने माणसे आंदोलनात आली नाहीत तितक्या उत्साहाने आज येत आहेत, नवीन नवीन माणसे येत आहेत, तरुण येत आहेत. म्हणजे शेतकरी संघटनेची आंदोलनाची ताकद दिवसेंदिवस वाढतच आहे. ही ताकद दुसऱ्या कोणाच्या हाती देण्याचा काहीच प्रश्न उद्भवत नाही.
 कापूस, कांदा, ऊस - परिस्थिती
 काही पिकांच्याबद्दल या अधिवेशनात आपल्याला विशेष चर्चा करावी लागेल. महाराष्ट्राचा विचार करता कापूस, कांदा आणि ऊस या तीन पिकांबद्दल विशेष चर्चा करून त्यावेळी जी काही परिस्थिती असेल त्यानुसार आंदोलनाचा कार्यक्रम आखावा लागेल.
 पन्नास वर्षे झाली देश स्वतंत्र होऊन. या पन्नास वर्षात शेतकऱ्याचं शोषण झालं. जमिनी नापीक झाल्या, जमिनीतील पाणी खोल खोल गेलं, शेतीची जनावरंसुद्धा पूर्वीच्या ताकदीची राहिली नाहीत, कर्जाचा बोजा वाढत गेला आणि शेतकऱ्यांना विष पिऊन मरण्यापलीकडे गत्यंतर राहिलं नाही. एकीकडे शेतकऱ्यांची अशी परिस्थिती झाली असताना ही परिस्थिती ज्या समाजवादी व्यवस्थेने केली ती व्यवस्थाही जगभर कोसळून पडली आहे. सगळं जग नियोजनाच्या ऐवजी 'ज्याचा त्याचा माल ज्याला त्याला पाहिजे तेथे, पाहिजे तसा विकण्याची मुभा असेल' अशा खुल्या बाजारपेठेच्या व्यवस्थेचा स्वीकार करू लागलं आहे. आपल्याकडे या परिस्थिती संदर्भात महत्त्वाचा फरक जाणवतो. आपण १९८० साली लढाई सुरू केली. आम्ही मांडणी केली की, "आम्हाला देणारा 'वर' आहे, एका दाण्याचे शंभर दाणे 'तो' करतो, आम्हाला कोणाकडूनही सूट-

माझ्या शेतकरी भावांनो मायबहिणींनो / १६०