पान:माझ्या शेतकरी भावांनो आणि मायबहिणींनो... (Mazya Shetkari Bhavanno Mayabhaininno...).pdf/१५७

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.


सांगली-मिरज अधिवेशनाची विषयपत्रिका


 धिवेशन : निर्णयप्रक्रियेची सर्वोच्च संस्था
 शेतकरी संघटनेसमोर एखादा प्रश्न उभा राहिला, शेतकऱ्यांच्या एखाद्या प्रश्नावर निर्णय घ्यायचा झाला म्हणजे आपण उच्चाधिकार समितीची बैठक घेतो. उच्चाधिकार समितीला जर वाटले की आपल्याला अधिकार दिलेले असले तरी निर्णय घेण्याआधी अधिक व्यापक चर्चा व्हायला हवी तर कार्यकारिणीची किंवा विस्तारित कार्यकारिणीची बैठक बोलावली जाते. प्रश्न त्याहीपेक्षा गंभीर असेल आणि कार्यकारिणीला वाटले की शेतकऱ्यांची व्यापक मान्यता मिळेल अशा तऱ्हेने विस्तृत चर्चा होऊनच निर्णय व्हायला पाहिजे इतका गंभीर प्रश्न पुढे आहे तर मग त्या विषयावर अधिवेशन बोलावले जाते. ही शेतकरी संघटनेची वर्षानुवर्षे चालत आलेली रीत आहे. अधिवेशनासाठी महाराष्ट्रभरच्या जिल्ह्याजिल्ह्यातून शेतकरी संघटनेचे पाईक स्त्री-पुरुष जमतात, इतर राज्यांचे प्रतिनिधीही जमतात. या सर्वांसमोर विषयपत्रिकेतील विषयांवर सविस्तर चर्चा होते. त्यानंतर निर्णय घेतला जातो. निर्णय घेताना आपण मतदान घेत नसलो तरी इतक्या मोठ्या जनसमुदायाच्या साक्षीने झालेल्या चर्चेचे सार काढून, चर्चेच्या वेळी समुदायाने दिलेल्या अनुकूल-प्रतिकूल प्रतिसादाची नोंद घेऊन, निर्णय घेतले जातात आणि ते अधिवेशनाच्या अखेरी होणाऱ्या खुल्या अधिवेशनात जाहीर केले जातात.
 शेतकरी संघटनेच्या आजपर्यंतच्या अधिवेशनांकडे मागे वळून पाहिलं तर शेतकरी संघटनेने हा रिवाज किती काटेकोरपणे पाळला आहे आणि त्या त्या वेळी घेतलेले निर्णय आणि आखलेले कार्यक्रम त्या त्या काळच्या परिस्थितीशी किती अनुरूप होते हे ध्यानात येईल.
 शेतकरी संघटनेचे पहिले अधिवेशन १९८२ मध्ये सटाणा येथे झाले. त्या आधी दोन वर्षे शेतकरी संघटनेची आंदोलने सुरू होती. चाकणच्या कांदा

माझ्या शेतकरी भावांनो मायबहिणींनो / १५७