पान:माझ्या शेतकरी भावांनो आणि मायबहिणींनो... (Mazya Shetkari Bhavanno Mayabhaininno...).pdf/१५५

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

की सरकारी नोकरदार असोत, त्यांनी संप केला तर सरकारला त्यांच्यासमोर नाक घासत जावे लागते आणि एक संप संपला की ते पुन्हा पुढच्या संपाच्या धमक्या देतच असतात. दुर्दैवाने, गुलामगिरीचे भोक्ते जितकी तडफ दाखवतात तितकी तडफ स्वातंत्र्याचे भोक्ते दाखवीत नाहीत. हे काय गौडबंगाल आहे यावरही या अधिवेशनात विचार करावा लागेल. आज, हातात 'लकडी' घेतल्याशिवाय सरकारची 'मकडी' वळत नाही असे सर्वत्र दिसत असताना आपल्यातला एखाद्या तरुण रक्ताच्या स्वातंत्र्याच्या भोक्त्याने हातात 'लकडी' घेण्याचा प्रस्ताव मांडला तर त्याला दोष देता येणार नाही. आपल्याला आतंकवाद्यांचे मार्ग अनुसरायचे नाहीत, तरीही आपले इप्तित, मग ते भले असो वा बुरे, साध्य करण्यासाठी ते ज्या हौतात्म्याची तयारी ठेवतात तशी तयारी शेतकऱ्यांनी ठेवली नाही तर शेतकऱ्यांच्या अजून कित्येक पिढ्या गुलामगिरीतच राहतील, त्यांना स्वातंत्र्य मिळण्याची काही शक्यता नाही.
 या अधिवेशनात या साऱ्या गोष्टीवर चर्चा करताना शेतकरी संघटनेच्या मूळ विचाराला विसरून चालणार नाही. शेतकरी संघटनेने सुरुवातीला जेव्हा शेतीमालाच्या रास्त भावाची संकल्पना मांडली तेव्हा सर्व प्रस्थापित आणि इतर पक्षांच्या नेते मंडळींनी शेतकऱ्यांना फुकट बियाणी, खतांवर सबसिडी, कमी दरात कर्जे, वीज अशी विविध प्रलोभने दाखवून शेतकऱ्यांना शेतकरी संघटनेपासून दूर करण्याचा प्रयत्न केला. अगदी "तुमच्या घरावर सोन्याची कौलं बसवून देऊ फक्त शेतीमालाचा भाव मागू नका." इथपर्यंतही त्यांची मजल गेली असती तरी आश्चर्य वाटले नसते. "घरावर सोन्याची कौलं जरी घालून दिली तरी शेतीमालाला रास्त भाव न देणाऱ्या व्यवस्थेत ती कौलं तीन वर्षांच्या आत सावकाराच्या घरी गहाण पडतील." एवढेच सांगायचे त्यांनी टाळले. उलट, "आम्हाला कोणतीही मेहेरबानी नको, आम्हाला आमच्या घामाचं दाम मिळू द्या." अशी मांडणी करणारी आपली शेतकरी संघटना आहे. "शेतीमालाच्या भावात लूट करून आमची जितकी रक्कम घेऊन जाता तितकी तरी सबसिडी द्या." अशी विनवणी करणारी आपली शेतकरी संघटना नाही. "शेतकरी कर्जात बुडाला तरी चालेल, पण शेतकऱ्याच्या मुलाला दिल्लीच्या पंचतारांकित हॉटेलमध्ये जेवण स्वस्तात मिळू द्या." अशी अचरट मागणी करणारीही आपली शेतकरी संघटना नाही. शेतकरी संघटनेने शेतीत फायदा करून देऊ असं आश्वासनं कधीही दिलेलं नाही. शेतकरी संघटनेने शेतकऱ्यांना दिलेले आश्वासन शेतकरी संघटनेच्या शपथेत आहे."...शेतकऱ्यांना सन्मानाने जिणे जगता यावे याकरिता

माझ्या शेतकरी भावांनो मायबहिणींनो / १५५