पान:माझ्या शेतकरी भावांनो आणि मायबहिणींनो... (Mazya Shetkari Bhavanno Mayabhaininno...).pdf/१५४

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

आलेल्या उत्पादनातून निवडून वेचून बियाणं शेतकरी ठेवायला लागले आणि याच प्रक्रियेतून नवीन नवीन बियाणं तयार करीत गेले. कोणी हायब्रीड बियाण्यांची निर्मिती केली, कोणी कलमांची पद्धती वापरली. एकूणात, बियाण्यांचा विकास हा निसर्गाने निर्माण केलेल्या मालाच्या निवडीने किंवा मिश्रणानंच होत होता. आता मनुष्य या मर्यादेतून सुटतो आहे आणि विश्वामित्राची प्रतिसृष्टी तयार करण्याची, नवीन जीवाचीच उत्पती करण्याची ताकद त्याच्या हाती आली आहे. समजा, आपल्या ज्वारीमध्ये दुसऱ्या ज्वारीमधील एखादा विशिष्ट गुण आणावयाचा असेल तर त्याचे मिश्रण करण्यासाठी जो खटाटोप आणि वेळ लागतो त्याची आता गरज पडणार नाही. आता ज्वारीच्या 'जीवसूत्रा'मध्ये आवश्यक ते बदल करून हव्या त्या गुणधर्मांच्या ज्वारीचं बियाणं विकसित करण्याची किमया मनुष्यानं हस्तगत केली आहे. यालाच जैविक तंत्रज्ञानाची क्रांती म्हणतात.
 तेव्हा, गोऱ्या इंग्रजांनी केलेलं शोषण, त्यानंतर पन्नास वर्षे काळ्या इंग्रजांनी केलेलं शोषण, त्यामुळे आलेली विपन्नावस्था, त्यानंतर खुलीकरण व जागतिकीकरणाच्या वाऱ्यामुळे येऊ घातलेली खुल्या व्यवस्थेची पहाट आणि तिच्या स्वागतास तयार राहाण्याचे बळ देणारी जैविक तंत्रज्ञानातील क्रांती अशा तीन क्रांतीच्या पार्श्वभूमीवर 'देवकीचं हे आठवं बाळ' जन्माला येत आहे. म्हणजे शेतकरी संघटनेचे आठवं अधिवेशन भरते आहे.
 या अधिवेशनात चर्चा करताना, पन्नास वर्षांत देशाची जी काही हलाखीची स्थिती झाली तिचा विचार करावा लागेल. त्याबरोबर, 'मरता क्या न करता' या उक्तीप्रमाणे समाजवादाला अखरेची घरघर लागल्यामुळे, या समाजवादी व्यवस्थेवर पुष्ट झालेले ऐतखाऊ घटक - नेता, तस्कर, गुंडा अफसर - व्यक्तीच्या स्वातंत्र्यावर ताबा ठेवण्याचे प्रयत्न आता निकराने करू लागले आहेत. गूळ काळा झाला तरी बंदी आणि पिवळा झाला तर त्यात रसायनांची भेसळ केली म्हणून बंदी हे सरकारचं धोरण किंवा भूजल विधेयक, २००० हे त्याच प्रयत्नांचा भाग आहे, कर्नाटकातील आम जनतेच्या गळ्यातील ताईत असलेल्या राजकुमारला चंदनतस्कर वीरप्पन पळवून नेतो आणि या सरकारच्या पोलिसांना त्याची सुटका करता येत नाही. मात्र तेच पोलिस शेतकऱ्यांकडील वीजबिलांच्या वसुलीसाठी मोठ्या ताकदीने येतात, कर्जवसुलीसाठी घरावरील पत्रे उचकटून नेण्याची मर्दुमकी गाजवतात. याचा अर्थ आपल्याला आपल्या या आठव्या अधिवेशनात शोधावा लागेल. गुलामी आणू पाहाणारे लोक मोठ्या तडफेने काम करतात. दूरसंचार खात्याच्या कर्मचाऱ्यांनी खुलीकरणाच्या विरोधात सरकारला नमवले, बँक कर्मचारी असोत

माझ्या शेतकरी भावांनो मायबहिणींनो / १५४