पान:माझ्या शेतकरी भावांनो आणि मायबहिणींनो... (Mazya Shetkari Bhavanno Mayabhaininno...).pdf/१५०

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.


वाघाचा जन्म वाघासारखं जगा


 शेतकरी संघटनेच्या ताकदीच्या दृष्टीने सगळा महाराष्ट्र थोडा मागे पडू लागला आहे की काय असे वाटत असताना सांगली, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यांतील म्हणजे दक्षिण महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांनी मोठ्या जोमाने आंदोलने सुरू केली. एवढेच नव्हे तर शेतकरी संघटनेच्या अधिवेशनाची जबाबदारी स्वीकारली ही एक विशेष बाब आहे. या भागातील आंदोलनांचे वृत्तांत आणि अधिवेशनाच्या तयारीचा अहवाल पाहता मला एका योगायोगाचा मोठा आनंद वाटतो आहे. १९४२ च्या स्वातंत्र्यलढ्यात ज्या प्रदेशाने प्रतिकार स्थापन करून गोऱ्या इंग्रजांना टक्कर दिली त्याच प्रदेशात, काळ्या इंग्रजांच्या शोषणातून मुक्त होण्यासाठी सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या स्वातंत्र्यलढ्यात प्रतिसरकार स्थापन होते आहे. ही शेतकरी आंदोलनातल्या नवीन युगाची सुरुवात आहे.
 पुष्कळदा काय होते? समोर येणारे जे प्रश्न असतात, अडचणी असतात त्यांनी कार्यकर्ते थोडे गांगरून जातात. आता शेतकऱ्यांना संघटनेचा विचार सांगून पहिल्यासारखा उत्साह त्यांच्यात निर्माण होत नाही, आता कसं काय पुढं जायचं असा प्रश्न मनात येऊन मग कोणता एखादा पक्ष आपल्याला निदान पायरीपाशीतरी बसवून घेतो का याचा तपास करण्याची बुद्धी तयार होते. अशावेळी कार्यकर्त्यांनी शेतकरी संघटनेच्या इतिहासाची मनोमन उजळणी केली पाहिजे. शेतकरी संघटनेचे इतिहासात स्थान काय आहे याचा अभ्यास आंबेठाणच्या प्रशिक्षण शिबिरात आवर्जुन केला जातो. त्याचा सारांश समस्त मानवजातीची प्रगती उत्क्रांतीतून होते; उत्क्रांती साधनांतून होते, साधने शेतीमालाच्या वरकड उत्पादनातून म्हणजे शेतीतील बचतीतून तयार होतात आणि शेतीतील बचत लुटारूंनी लुटून नेली तर मानव जातीची प्रगती थांबते असा आहे. आज आपल्या देशातील प्रगती खुंटली आहे. प्रगतीच्या प्रवाहाला जे बांध पडले आहे ते बांध

माझ्या शेतकरी भावांनो मायबहिणींनो / १५०