पान:माझ्या शेतकरी भावांनो आणि मायबहिणींनो... (Mazya Shetkari Bhavanno Mayabhaininno...).pdf/१४४

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 मी ही मांडणी केली; पण मला एका गोष्टीचे मोठे नवल वाटले. गेल्या वर्षी शेकडो शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, यावर्षीही आत्महत्या होऊ लागल्याच्या बातम्या येऊ लागल्या आहेत, पण शेतकऱ्याच्या घरच्या परिस्थितीची जाणीव देशाच्या राजधानीमध्ये, वित्तमंत्र्यांच्या दालनामध्ये, सबंध राष्ट्रपती भवनामध्ये किंवा साऊथ ब्लॉकमध्ये आणि नॉर्थ ब्लॉकमध्ये मला कोठेही दिसली नाही.
 याच सुमारास माझी दुसरी मुलाखत झाली ती जागतिक व्यापार संघटनेचे महानिदेशक श्री. माईक मूर यांच्याशी संपूर्ण जगामध्ये खुली व्यवस्था तयार व्हावी याकरिता प्रयत्न करण्यासाठी स्थापन झालेली ही संस्था आहे. ते दिल्लीमध्ये तीन दिवस होते. त्या काळात ते राष्ट्रपतींना भेटले, पंतप्रधानांना भेटले, वित्तमंत्र्यांना भेटले; पण खासगी संस्थापैकी कोणालाही भेटले नाहीत. फक्त, शेतकरी संघटना ही खुल्या व्यवस्थेच्या बाजूने आहे अशी माहिती त्यांना होती, त्यामुळे त्यांनी शेतकरी संघटनेची भेट माझ्या माध्यमातून घेतली. मी त्यांना सांगितले, "संपूर्ण जगामध्ये शेतकऱ्यांना सबसिडी आहे; जपानमधील शेतकऱ्याला ९० टक्के सबसिडी म्हणजे १०० रुपये माल पिकविला तर त्याला १९० रुपये मिळण्याची व्यवस्था आहे; युरोपमधील शेतकऱ्याला ६५ टक्के, तर अमेरिकेतल्या शेतकऱ्याला ३५ टक्के सबसिडी आहे. हे सर्व जागतिक व्यापार संघटनेच्या अहवालात म्हटलेले आहे." मी त्यांना विचारले, "आपल्याला हे माहीत आहे का की, हिंदुस्थान हा असा करंटा देश आहे की ज्या देशामध्ये शेतकऱ्याने १८७ रुपयांचा माल पिकवला तर त्याला जास्तीत जास्त १०० रुपये मिळावे अशी व्यवस्था आहे?" ते आश्चर्यचकित होऊन माझ्याकडे पाहत बसले आणि म्हणाले, "माझा यावर विश्वासच बसत नाही." जागतिक व्यापार संघटनेच्या जवळजवळ १४० सदस्य देशांपैकी एखाद्या देशात शेतकऱ्यावर अशी उलटी पट्टी बसत असेल हे त्यांच्या कल्पनेबाहेरचे होते. मी त्यांना त्यांच्या संस्थेचे अहवाला तपासून पाहण्याची विनंती केली आणि त्यांच्यासमोर, हिंदुस्थान सरकारच्या वाणिज्य मंत्रालयाने जागतिक व्यापार संघटनेला सादर केलेल्या, आपले सरकार शेतकऱ्यांवर उणे सबसिडी लादत असल्याचा कबुलीजवाब देणाऱ्या कागदपत्रांच्या प्रती ठेवल्या.
 मग प्रश्न आला की याबाबतीत काय करायचे? शेतकरी संघटनेचे असंख्य कार्यकर्ते आपली घरेदारे सोडून या अन्यायाला विरोध करण्याचे काम गेली वीस वर्षे करीत असल्याचे मी त्यांना सांगितले. डंकेल प्रस्तावाच्या रूपाने आमच्या आंदोलनातील, मांडणीतील यथार्थताच सिद्ध झाली. त्यावेळी मी जाहीरपणे म्हटले होते की डंकेल जर कधी भेटले तर माझ्या छातीवरील शेतकरी संघटनेचा बिल्ला मी त्यांच्या छातीवर सन्मानपूर्वक लावेन. माईक मूरना मी म्हटले की, "आता

माझ्या शेतकरी भावांनो मायबहिणींनो / १४४