पान:माझ्या शेतकरी भावांनो आणि मायबहिणींनो... (Mazya Shetkari Bhavanno Mayabhaininno...).pdf/१३५

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

अंततोगत्वा, सर्व देशाच्या हिताचे निर्णय असतात. ही समाजवादी व्यवस्था टिकू शकणार नाही हे आपण पहिल्यांदा सांगितले. ज्यावेळी समाजवादी व्यवस्थेचा बोलबाला होता, डॉ. मनमोहनसिंगांसारखे अर्थशास्त्रीसुद्धा ज्यावेळी समाजवादाची भाषा बोलत होते तेव्हा, समाजवादाचे अध:पतन निश्चित आहे हे भाकीत आपण केले आणि त्याप्रमाणे जगभर समाजवादाचा पाडाव झाला. आज कोणताही पक्ष समाजवादाची भाषा बोलत नाही. सत्तेच्या खुर्चीवर बसण्याआधी सगळेच म्हणतात की खुली व्यवस्था वाईट आहे, धोक्याची आहे, तिच्यामुळे काय होईल कोणास ठाऊक? पण खुर्चीवर चढले की एका दिवसातच ते खुल्या व्यवस्थेच्या बाजूने बोलू लागतात. म्हणजे, 'नाही नाही' म्हणत खुल्या व्यवस्थेचा सर्वांनीच स्वीकार केला आहे. पण मग, समाजवाद संपून खुली व्यवस्था आली तरी कांद्याच्या शेतकऱ्यांचे, उसाच्या शेतकऱ्याचे, कापसाच्या शेतकऱ्याचे दैन्य का संपले नाही? कर्ज वाढायचे का थांबले नाही? या महत्त्वाच्या प्रश्नाचे उत्तर आज सगळे शेतकरी शोधताहेत.
 याबद्दलची सैद्धांतिक मांडणी आपण आजवर सातत्याने करीत आलो आहोत.
 खुली व्यवस्था आली म्हणतात तरी परिस्थितीत काहीच बदल नाही यावर उपाय काढण्यासाठी शेतकरी संघटनेचा पुढचा कार्यक्रम काय?
 २१ जानेवारीला शेतकरी संघटनेच्या कार्यकारिणीची बैठक आहे. त्यात कार्यक्रमासंबंधी निर्णय घेतला जाईल; पण आपण मोठ्या कठीण अवस्थेत आहोत हे नाकारण्यात काही अर्थ नाही. मला तुमच्या मनामध्ये निराशा आणायची आहे म्हणून मी असे बोलतो असे नाही; पण आपला राजकीय पराभव झाला आहे ही गोष्ट सत्य आहे. शेतकऱ्याला 'शेतकरी' म्हणून स्वाभिमान असावा, सन्मानाने जगण्याची इच्छा असावी हे आम्ही मांडले; पण माधवराव मोऱ्यांच्या भाषेत सांगायचे तर 'मांजराला कितीही मिठाई खाऊ घातली तरी उंदीर पाहिल्याबरोबर ते उंदराच्याच मागे जाते, मिठाई सोडून देते.' तसंच, शेतकरी म्हणून सन्मान मानण्याऐवजी, कुणी रामाचं नाव घेतलं, कुणी शिवाजीचं नाव घेतलं तर आम्ही आमचा सन्मान सोडून त्यांच्या पाठीमागे गेलो. शेतकरी संघटेचा राजकीय पराभव झाला ही गोष्ट खरी आहे.
 अर्थकारणामध्ये आपण जे जे मांडले ते ते तसे घडले ही गोष्ट खरी आहे; पण हा विचार शेतकरी संघटनेने मांडला, शरद जोशींनी मांडला असे काही श्रेय कुणी दिले नाही. आपण दस्तऐवज भले केले पण आपली त्यावर सही काही उमटली नाही. परदेशात कोणाला विचाराल की खुली व्यवस्था हिंदुस्थानात कुणी आणली तर डॉ. मनमोहन सिंग, पी.व्ही. नरसिंहराव यांची नावे घेतली जातात. याचे कारण आपण जे काही शिल्प कोरले त्यावर आपण आपले नाव

माझ्या शेतकरी भावांनो मायबहिणींनो / १३५