पान:माझ्या शेतकरी भावांनो आणि मायबहिणींनो... (Mazya Shetkari Bhavanno Mayabhaininno...).pdf/१३४

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 वीस वर्षांपूर्वी शेतकरी संघटनेची सुरुवात झाली. 'देशात गरिबाचे कारण शेतकऱ्यांची गरिबी, शेतकऱ्यांच्या गरिबाचे कारण शेतीमालाला भाव नाही आणि शेतीमालाला भाव नाही याचे कारण गोऱ्या इंग्रजांच्या जागी काळा इंग्रज आला.' एवढे साधे अर्थकारण हा शेतकरी संघटनेचा पाया आहे. कांद्याचा लढा झाला, उसाचा लढा झाला, कापसाचा लढा झाला, कर्जमुक्तीचा लढा झाला. कशाचीही फिकीर न करता आम्ही रानोमाळ फिरलो. दुसऱ्या कोणत्या गोष्टीचे नाही तरी एका गोष्टीचे श्रेय मी अवश्य घेईन. महाराष्ट्रात जोतिबा फुल्यांसारखे महान द्रष्टे नेते झाले; पण महाराष्ट्राच्या बाहेर, काही प्रागतिक चळवळी मंडळी सोडली तर इतरांना 'जोतिबा फुले म्हणजे कोण' हे सांगावे लागते. उत्तरेत सर छोटूराम यांच्यासारखा किसान अग्रणी झाला पण तोसुद्धा पंजाब-हरियाणाच्या बाहेर पडूच शकला नाही. शेतकरी संघटनेने याबाबतीत मोठी कर्तबगारी दाखविली. शेतकरी संघटना जिल्ह्यापुरती किंवा महाराष्ट्रापुरती मर्यादित ठेवली नाही; तर शेतकरी संघटनेचा नेता गुजरातच्या शेतकऱ्यांच्या मदतीकरिता जातो, नर्मदा धरणावरील कारसेवेचे आंदोलन जाहीर करतो, त्या आंदोलनात महाराष्ट्रातून हजारो स्त्रीपुरुष शेतकरी सत्याग्रही जातात, त्यांच्याबरोबर पंजाबातील शीख शेतकरीही हजारांच्या संख्येने येतात, हरियाणातले येतात, इतर राज्यातलेही येतात. हे पूर्वी कधीही न घडलेले नवल शेतकरी संघटनेने घडवून आणले.
 शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखालील शेतकरी चळवळ फक्त महाराष्ट्रापुरती मर्यादित न राहता ती देशभरच्या शेतकऱ्यांची झाली. असे असले तरी दम सुटावा, निराशा वाटावी अशा अनेक गोष्टीही आहेत.
 आपल्या शेतकरी चळवळीची सुरुवात कांद्याच्या भावाने झाली. आज वीस वर्षांनंतर कांदा उत्पादक शेतकऱ्यांची तीच स्थिती आहे. त्यावेळी आपण कांद्याला क्विंटलला अठरा रुपयेच भाव येतो म्हणून रडत होतो. आज दीडशे ते एकशे ऐंशीच्यावर जात नाही म्हणून रडतो. कारण, आजच्या रुपयाची किंमत जुन्या दहा रुपयांइतकीही राहिली नाही. साखरेच्या आयातीमुळे उद्योगावर संकट आले आहे. ऊसउत्पादक शेतकऱ्यांवर संकट आले आहे. कापसाच्या आयातीमुळे कापसाचा भाव इतका पडू लागला आहे की गुजरात, पंजाब, हरियाण मधील शेतकरी कापसाच्या भावाचे आंदोलन करायला उभे राहिले आहेत.
 १९८० मध्ये आपण काय मांडले? समाजवादाच्या नावाखाली शेतकऱ्यांना लुटण्याचे षड्यंत्र रचले जात आहे, कारस्थान रचले जात आहे. हा समाजवाद टिकू शकत नाही, खुली व्यवस्था येणे अपरिहार्य आहे. कारण, कोणाही एका माणसानं दिल्लीत किंवा मॉस्कोत बसून यंत्रणा चालवायची म्हटले तर ती चालू शकत नाही. शेतकऱ्यांनी स्वतःच्या हिताच्या दृष्टीने घेतलेले निर्णय हेच,

माझ्या शेतकरी भावांनो मायबहिणींनो / १३४