पान:माझ्या शेतकरी भावांनो आणि मायबहिणींनो... (Mazya Shetkari Bhavanno Mayabhaininno...).pdf/१३३

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.


नुसता नवा जोम नव्हे, नवी रणनीती हवी


 वाज उठत नाही - कारण गेल्या वर्षभराचा आजार. दुसरं कारण काल दिल्लीहून येताना माझा आवाज अचानक बंद झाला, तुमचं प्रेम पाहून थोडे तरी शब्द बाहेर येताहेत आणि तिसरी गोष्ट, हा जो कार्यक्रम तुम्ही केला त्यानं माझं मन खरोखर इतकं भरून आलं आहे की, तोंडातून निघत नाही.
 अण्णासाहेबांच्या स्मृतिनदिनानिमित्त मी श्रीरामपूरला यायचं कबूल केलं - त्यांची आणि आमची मतं सगळीच काही जमतात असं नाही, कुणाचीच जमत नाहीत; पण अण्णासाहेबांची थोरवी आपल्या सगळ्यांना मान्य आहे. त्यांच्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने शेतकरी जोतिबा फुल्यांच्या काळापासून निघाला कोठे; चालला आहे कुठे आणि आज आहे कुठं याच सिंहावलोकन करण्याची संधी मिळते म्हणून मी इथं आलो आणि ही जिल्ह्याची बैठक घेतलीत, फुलांनी स्वागत केलं.
 मी प्रामाणिकपणे सांगतो की ज्याप्रमाणे शिवाजी महाराजांना आग्र्याहून सुटका झाल्यानंतर आपले मावळे सगळे महाराष्ट्रात शिल्लक असतील किंवा नाही अशी चिंता वाटत होती, त्याचप्रमाणे या आजारपणातून उठून आल्यानंतर माझ्याही मनाची काहीशी अशीच अवस्था होती. श्रीरामपूर वगैरे भागामध्ये शेतकरी संघटनेच्या सुरुवातीच्या काळात केवढ्या प्रचंड सभा झाल्या, कशी भाषणे झाली, किती कार्यकर्ते तयार झाले; पण आता ओहोटीची लाट येऊन वाळूचे किल्ले सगळे वाहून जावे अशी परिस्थिती झाली असावी काय अशा काहीशा चिंतेत मी असताना तुम्ही सगळे जुने कार्यकर्ते एवढ्या मोठ्या संख्येने जमा झालात यामुळे माझ्या मनाला फार मोठा आधार वाटला. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही आग्रहाआग्रहाने बोललात. मी किती वेळ बोलू शकेन हे महत्त्वाचे नाही; पण तुम्ही प्रत्येकाने बोलताना आजही, इतक्या कठीण परिस्थितीत शेतकरी संघटनेविषयी ज्या विश्वासाने अपेक्षा व्यक्त केल्या त्यामुळे खरंच माझं मन भरून आलं आहे.

माझ्या शेतकरी भावांनो मायबहिणींनो / १३३