पान:माझ्या शेतकरी भावांनो आणि मायबहिणींनो... (Mazya Shetkari Bhavanno Mayabhaininno...).pdf/१३२

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

शेतकऱ्यांनी आपल्याला ऊस घालावा अशी त्यांची इच्छा असली तर गलथानपणे काम करून चालणार नाही, शेतकरी आपला पोशिंदा आहे, तो आपला देव आहे, तो खुश होईल अशा तऱ्हेने कारखाना चालवायला पाहिजे असं संचालकांना वाटायला लागेल.
 पण सरकारनं तर झोनबंदीच्या बेड्या आपल्या पायात घातल्या आहेत. पलीकडच्या चांगला भाव देणाऱ्या कारखान्यालाही तुमचा ऊस घ्यायला मनाई केली आहे. त्यामुळे या थडग्यांचीही मक्तेदारी झाली आहे. जोपर्यंत झोनबंदीमुळे आलेली ही मक्तेदारी चालणार आहे तोपर्यंत हा कारखाना सुधारण्याची काहीच शक्यता नाही.
 गेल्या ५० वर्षांत, समाजवादाच्या नावाखाली, गरीबाचं कल्याण करतो म्हणून गरिबांना लुटण्याचे कारखाने तयार झाले. आता या भिंती तोडून मोकळी हवा देशामध्ये येऊ लागलेली आहे; पण ती अजून शेतकऱ्यांच्या घरी येत नाही. शेतकऱ्यांच्या हातापायात अजूनही या दंडबेड्या आहेत. या दंडबेड्या तोडण्याकरिता आपण हा हातोडा होती घेतला आहे. ही पहिली पायरी आहे.
 दुसरी पायरी २३ नोव्हेंबर १९९५ रोजी पुणे येथे साखर संचालकांच्या कार्यालयासमोर महाराष्ट्रभरचा भव्य मोर्चा जाणार आहे. आता हाती घेतलेला हातोडा आपल्या हातापायातल्या दंडबेड्या तोडल्याशिवाय खाली ठेवायचा नाही अशी प्रतिज्ञा करून कामाला लागू या.

(१५ नोव्हेंबर १९९५ हातोडा मोर्चा अंबोजोगाई)
(शेतकरी संघटक २१ नोव्हेंबर १९९५)

◼◼

माझ्या शेतकरी भावांनो मायबहिणींनो / १३२