पान:माझ्या शेतकरी भावांनो आणि मायबहिणींनो... (Mazya Shetkari Bhavanno Mayabhaininno...).pdf/१३१

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 गेली १५ वर्षे आपण सरकारच्या या सगळ्या नियमांविरुद्ध लढतो आहोत. सरकार शेतकऱ्याला जाणीवपूर्वक लुटतं आणि या सहकारी संस्थाचं कौतुक सांगत. या संस्था म्हणजे मंदिरं नसून ती शेतकऱ्यांची थडगी आहेत असं गेली पंधरा वर्षे आम्ही सांगत आलो आहोत.
 तीन वर्षांपूर्वी सरकारचे डोळे थोडे उघडले. रशिया बुडाला, समाजवाद बुडाला, नेहरूंच नियोजन बुडालं तेव्हा सरकारनं कबूल केलं की आम्ही शेतकऱ्याला दरवर्षी लुटतो. १९८६ ते १९८९ सालापर्यंत दरवर्षी शेतकऱ्याला २४००० कोटी रुपयांना लुटल्याची कबुली सरकारने दिली आहे. सगळ्या शेतकऱ्यांचं पिढ्यानपिढ्या साचलेलं कर्ज फक्त १४००० कोटी रुपयांचं. १९९२ आणि १९९३ मध्ये शेतकऱ्यांना दरवर्षी ४२००० कोटी रुपयांना लुटल्याची आता पुढे कबुली दिली आहे.
 आम्ही आज हातोडे घेऊन निघालो आहोत ते का? दिल्लीहून सरकारने जाहीर केले की आता नियोजन संपलं, बंधनांचा खोटेपणा संपला, आता याच्यापुढे मुक्त व्यवस्था येणार, याच्यापुढे ज्याला त्याला उद्योजक बनून घामाला दाम मिळवायचा अधिकार असेल.आपलं म्हणणं काय आहे? या नवीन व्यवस्थेमध्ये शेतकऱ्याला काय पाहिजे ते पिकवता आलं पाहिजे आणि जो माल पिकवेल त्याला पाहिजे तसा आणि पाहिजे तिथं विकता आला पाहिजे. ऊस म्हटला की ऊस म्हणून, गूळ केला तर गूळ म्हणून, या कारखान्याला नको वाटलं तर साखर इथं विकीन नाहीतर लंडनला जाऊन विकीन. मला माझा उद्योग करण्याचं स्वातंत्र्य असलं पाहिजे. एवढंच आमचं म्हणणं आहे. आम्ही ऐंशी सालापासून म्हणतो आहोत, "भीक नको, हवे घामाचे दाम." आजपर्यंत आपलंच लुटून आपल्यालाच दान करण्याचा भामटेपणा या लोकांनी केला. म्हणून आपण हा हातोडा घेऊन निघालो आहोत. सगळ्या लोकांना मोकळं करू म्हणतात पण शेतकऱ्यांना मोकळं करायला तयार नाहीत. शेतीमालाच्या निर्यातीला बंदी. कापूस एकाधिकार योजनेलाच विकला पाहिजे. या हातोड्यानं आम्हाला जखडणाऱ्या या बंधनांच्या बेड्या तोडायच्या आहेत.खुली व्यवस्था आणायची आहे.
 ही खुली व्यवस्था आणायची कशी? आज आपण हातोडा घेऊन निघालो आहोत मागणी करायला की, ज्याला कुणाला कारखाना काढायचा असेल त्याला कारखाना काढायची परवानगी मिळाली पाहिजे. सरकारला लेव्ही देणं बंद, माल कुठं विकायचा आम्ही ठरवू, इथं भाव मिळत नसला तर निर्यात करू. आमच्या जवळचा कारखाना चांगला भाव देत नसेल तर आम्ही पाहिजे त्या कारखान्याला ऊस घालून भाव मिळवू. असं एकदा झालं म्हणजे एकतर शेतकऱ्यांची थडगी झालेले हे कारखाने बंद पडतील, नाहीतर सुधारायचा प्रयत्न करतील आणि

माझ्या शेतकरी भावांनो मायबहिणींनो / १३१