Jump to content

पान:माझ्या शेतकरी भावांनो आणि मायबहिणींनो... (Mazya Shetkari Bhavanno Mayabhaininno...).pdf/१३०

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

सगळी माणसं ही भरताड आहेत आणि उसाचा भाव खाणारी आहेत. जर कारखाना कार्यक्षमतेने चालवायचा असेल तर आवश्यक तितकीच कामगार मंडळी ठेवली पाहिजे. पण कारखाना ही चांगली गोष्ट आहे, इथे भरपूर खायला मिळतं त्यामुळे भरपूर कीड लटकली आहे.
 यातूनही कारखान्यांनी साखर तयार केली तर ती विकण्याचं स्वातंत्र्य नाही. सरकारला निम्या दरात लेव्ही घालावी लागते, उरलेली ठराविक काळात येईल त्या किमतीत लिलावात विकावी लागते. परदेशात साखर पाठवायला बंदी.
 शेतकऱ्यांनी जर म्हटलं की मी जिवापाड मेहनत करून ऊस पिकवला, हा कारखाना बुडतो आहे, या कारखान्याकडून मला २६० रुपयेच भाव मिळणार आहे, शेजारचा कारखाना ६०० रुपये द्यायला तयार आहे. तर शेतकरी शेजारच्या कारखान्यात ऊस घेऊन जाऊ शकत नाही. कारण सरकारनं झोनबंदी केली आहे. शेतकऱ्यांनी, भाव कितीही मिळो, त्यांच्याच झोनमधील कारखान्याला ऊस घातला पाहिजे. कारण काय? कारण यांनी राजकीय सोयीसाठी संस्थानं तयार केलीत ती टिकायला पाहिजे. मग ती कुणाच्या का जिवावर टिकेनात! संचालकांची चैन कुणाच्या जिवावर चालणार आहे, निवडणुकीमध्ये पैसे कुणाच्या जिवावर उधळले जाणार आहेत आणि कामगारांना वाटेल तितकी भरती करून पगार वाटप कुणाच्या जिवावर होणार आहे? शेतकऱ्यांच्याच जिवावर ना?
 झोनबंदी किती भयानक प्रकार आहे? साखर कारखाना काढायचा म्हणून शेतकऱ्यांकडून शेअर भांडवल जमा केले. शेतकऱ्यांनी शेअर घेतला म्हणजे तो काही त्याच कारखान्याला ऊस द्यायला बांधलेला नव्हता; पण सरकारने कायद्याने ते बंधन घातले. हे झालं शेअरधारकांचं. ज्यांनी शेअर घेतले नाहीत त्यांच्यावरही हेच बंधन. खरं तर जे भागधारक नाहीत त्यांचा कारखान्याशी काहीच संबंध नाही. कारखाना कसा चालतो हे पाहण्याचा त्यांना कधी प्रसंग येण्याचे काहीच कारण नाही. कारखान्याच्या निर्णय प्रक्रियेत ते मत देऊ शकत नाहीत. मग ते कसे काय याच कारखान्यांना ऊस द्यायला बांधलेले आहेत? तरीही झोनबंदी करून सरकारने ऊसउत्पादकांवर बंधने लादली आहेत. एखाद्या बिगरसभासदाने विचारावे, "मला सदस्य करून घेता का?" तर ते म्हणतात, "नाही, तुम्ही माझ्या गटातले नाहीत. तुम्ही आत येऊन राजकारण कराल."
 अंबाजोगाईच्या कारखान्यात १९००० सदस्य होते, त्यात ऊसउत्पादक फक्त ५००० च होते असे एकतो. म्हणजे १४००० सदस्य केवळ आपली मत विकणारे झाले. म्हणजे १४००० खाणारे आणि ५००० पिकविणारे. पिकविणारांचा फडशा पडायला किती वेळ लागणार?

माझ्या शेतकरी भावांनो मायबहिणींनो / १३०