पान:माझ्या शेतकरी भावांनो आणि मायबहिणींनो... (Mazya Shetkari Bhavanno Mayabhaininno...).pdf/१२३

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

"हा दिवा आहे की नाही याबद्दल माझ्या मनात शंका आहे, पण परमेश्वर आहे याबद्दल माझ्या मनात खात्री आहे." माझा पुढे प्रश्न असा आहे की, "ज्या माणसाचा दिव्याच्या अस्तित्वावर विश्वास नाही त्या माणसाला भूदानासारखा कार्यक्रम हाती घेऊन घरोघर तसे दिवे तेवावेत म्हणून प्रचार करण्याचा नैतिक अधिकार काय आहे?"
 लोकांचं भलं कशात आहे, लोकांना काय साधायचं आहे ते आम्ही सांगत नाही. हजारो वर्षांच्या इतिहासाचं अवलोकन करता लक्षात येतं की माणसं सुखाचा शोध घेत नाहीत, समाधानाचा शोध घेत नाहीत, आनंदाचा शोध घेत नाहीत. माणसं भरल्या ताटावरूनही उठून जातात, नवीन बाळ आणि त्याची आई घर सोडून जातात. याचं कारण माणसाचा शोध काही वेगळा आहे. तो शोध कशाचा आहे?
 माणूस ज्याच्या शोधात सातत्याने आहे त्याला आपण नाव दिलं 'स्वातंत्र्याच्या कक्षा'. माणसाच्या आयुष्याची किंवा समाजाच्या आयुष्याची गुणवत्ता कशी मोजायची?
 आयुष्यात तुम्हाला निवड करण्याची संधी किती वेळा मिळते? ही झाली स्वातंत्र्याची कक्षा क्रमांक एक. तुम्ही जर गरीब असाल तर तुम्हाला निवड करण्याची संधी मिळतच नाही. गरिबाच्या पोराला खेळायला लाकडी बैल मिळाला तरी खूपच कौतुक; पण श्रीमंताचं पोर पाचशे प्रकारची खेळणी घेऊन खेळतं, कॉम्प्युटरवर खेळतं. त्यातून ते निवड करू शकतं. शाळा शिकायची असो, पाणी प्यायचं असो किंवा नोकरी मिळवायची असो गरिबाघरच्या पोराला निवड करण्याची संधी कमी, श्रीमंताघरच्या पोराला जास्त.
 निवड करण्याची संधी जेव्हा जेव्हा मिळते तेव्हा निवडीसाठी किती पर्याय असतात? ही झाली स्वातंत्र्याची कक्षा क्रमांक दोन. गावातल्या पोराला शाळेत जायची संधी मिळाली तरी त्याला जिल्हा परिषदेच्या शाळेशिवाय पर्याय नसतो. शहरातल्या पोराला शाळानिवडीसाठी अनेक पर्याय असतात.
 निवडीसाठी जे पर्याय उपलब्ध होतात ते किती व्यापक असतात? ही स्वातंत्र्याची कक्षा क्रमांक तीन. गावातील शाळेत एकच अभ्यासक्रम तोही मराठीतूनच. शहरातील शाळेत वेगवेगळे अभ्यासक्रम वेगवेगळ्या माध्यमातून निवडीसाठी उपलब्ध असतात.
 स्वातंत्र्याच्या तीन कक्षा धरून मार्क्सच्या अद्वैतभावाच्या कल्पनेद्वारे सुधारणा केली आणि त्याच्या गुणवत्तावाचक शब्दाला संख्यावाचक रूप दिले. मार्क्सचं तत्त्वज्ञान सुसंगत व्हायचं असेल तर मार्क्सने गुणवत्तावाचक शब्दाऐवजी

माझ्या शेतकरी भावांनो मायबहिणींनो / १२३