पान:माझ्या शेतकरी भावांनो आणि मायबहिणींनो... (Mazya Shetkari Bhavanno Mayabhaininno...).pdf/११४

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

सिगरेटची सवय असलेल्या एखाद्या माणसाला एखादे वेळेस सिगरेट मिळाली नाही तर तो रात्रीअपरात्री अंधारातून खड्डेखुड्डे पार करून एका सिगारेटसाठी दोन-चार मैल जातो. भाकरी न मिळालेल्या माणसांनी क्रांती घडवून आणल्याचं उदाहरण नाही पण व्हिस्की न मिळालेल्या माणसांनी क्रांत्या घडवून आणल्याची उदाहरणे आहेत. मग भाकरीची भूक आणि सिगरेट-व्हिस्कीची भूक यांचे मोजमाप व तुलना कशी करायची? आणि भाकरी मिळाल्यावर होणारे समाधान व सिगरेट, व्हिस्की मिळाल्यावर होणारे समाधान यांचे मोजमाप आणि बेरीज कशी करायची? पण अशा या समाधानाच्या मोजमापाच्या कल्पनेवरही एक तत्त्वज्ञान उभे करण्यात आले. त्याला म्हणतात कल्याणकारी अर्थशास्त्र (Welfare Economics) त्याची चेष्टा झाली, कारण यात शास्त्रीयता काही नाही.
 मार्क्सचा समाजवाद
 मग, समाजवादाच्या मार्क्सप्रणीत तत्त्वज्ञानाचा उगम झाला. मार्क्सवाद्यांचा मोठा अहंकार आहे की आम्ही संतवादी नाही, आम्ही व्यत्ययवादी नाही. आम्ही शास्त्रीय समाजवादा (Scientific Socialism) चे पुरस्कर्ते आहोत. त्यांनी समानतेसाठी वेगळा युक्तिवाद मांडला.
 अगदी सुरुवातीला मनुष्यप्राणी उत्पादन करू लागला तेव्हा जसं आजही पशुपक्षी करतात तसं उत्पादन करायचं आणि खायचं असं त्याचं स्वरूप होतं. पुढे उत्पादनातील खाऊन बचत तयार झाली तेव्हा आपल्याकडची बचत दुसऱ्याला देऊन त्याबदली त्याच्याकडील आपल्याला हवी ती वस्तू घ्यायची अशा तऱ्हेने विनियम व्यवस्था म्हणजे व्यापार सुरू झाला. सुरुवातीला पैसा नव्हता; पण देवाणघेवाणीच्या सोयीसाठी त्याची निर्मिती झाली. आपल्याकडची बचत बाजारात विकून पैसा घ्यायचा आणि मग त्या पैशातून आपल्याला हवी ती वस्तू घ्यायची. तिचा वापर करून अधिक बचत तयार करायची. म्हणजे पैसा ही मुख्य वस्तू नाही. आपल्याकडे उत्पादनातील बचतीचा माल आहे त्याच्यातून पैसा म्हणजे धन करायचं आणि नंतर त्या धनातून पुन्हा आपल्याला माल तयार करता यावा अशी ही 'मा-ध-मा' म्हणजे मार्क्सच्या भाषेत Commodity-Money-Commodity अशी व्यापार व्यवस्था होती.
 पुढे ही व्यवस्था विपरीत झाली आणि व्यापाराचं सूत्र असं झालं की ज्याच्याकडे धन आहे तो आपल्याकडील धन वाढविण्यासाठी आपल्याकडील धना(ध)चा वापर करून माल तयार करून घेतो आणि तो माल विकून आधीच्यापेक्षा जास्त धन (धा) तयार करतो. म्हणजे मा- ध-मा या व्यवस्थेतील 'मा' ने सुरुवात करण्याऐवजी 'ध' ने सुरुवात करून 'मा' चे उत्पादन करायचे व त्यापासून 'ध'

माझ्या शेतकरी भावांनो मायबहिणींनो / ११४