पान:माझ्या शेतकरी भावांनो आणि मायबहिणींनो... (Mazya Shetkari Bhavanno Mayabhaininno...).pdf/११३

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

त्यांच्याकरिता काहीतरी करायला पाहिजे या करुणेच्या भावनेतून प्राथमिक समाजवादाचा जन्म झाला. सोयीसाठी समाजवादाच्या या पहिल्या पायरीला आपण करुणेवर आधारलेला संतांचा समाजवाद म्हणू.
 ऐतखाऊंचे तत्त्वज्ञान
 समाजाने कष्ट करावे आणि त्याने दिलेल्या अन्नधान्यावर फुकट जगावे अशी ज्यांची इच्छा असते त्यांना आपण करुणेवर जगतो आहोत असं म्हणणं आवडत नाही. मग अशी ऐतखाऊ माणसं काही तत्त्वज्ञान तयार करतात. भिकेसाठी पहिलं तत्त्वज्ञान धार्मिकांनी तयार केलं. आम्ही प्रपंचाच्या चिखलात अडकू इच्छित नाही. तुम्ही कमवा, आम्हाला खाऊ घाला, आम्ही तपस्या करू, पुण्य जोडू, त्यातील काही तुम्हाला पावेल आणि तुम्हाला भवसागर पार करायला ते उपयोगी पडेल.
 औद्योगिक क्रांतीनंतरच्या काळात अर्थशास्त्री मंडळी पेचात पडली. एकाकडे खूप पैसे, दुसऱ्याकडे काही नाही. ही विषमता दूर झाली पाहिजे. मग त्यांनी युक्तिवाद काढायला सुरुवात केली. ज्याच्याकडे आहे त्याने आपल्यातील, दुसऱ्या गरिबाला दिलं पाहिजे. कोणी मागितलं तर देऊ असं म्हणून नाही चालायचं. या अर्थशास्त्री मंडळींनी तत्त्वज्ञान मांडलं की समाजातील सर्व व्यक्तींच्या समाधानाची बेरीज जास्तीत जास्त होईल अशा तऱ्हेने समाजाच्या सर्व संपत्तीचे समान वाटप व्हायला पाहिजे. समाधान कसं मोजायचं?
 कल्याणकारी अर्थशास्त्र
 समजा, तुम्हाला खूप भूक लागली आहे. अशा वेळी एक चतकोर भाकरी मिळाली तर किती आनंद होतो? दुसरा चतकोर खाताना आनंद पहिल्यापेक्षा कमी होतो. तिसऱ्या चतकोराच्या वेळी आणखी कमी होतो. दोनचार भाकऱ्या खाऊन पोट भरलं की आनंद होणे थांबतं आणि पुढच्या प्रत्येक चतकोराबरोबर नकोसेपण वाढत जाते. अशा प्रकारच्या अनुभवांचं मोजमाप करून समाजातील सर्व ग्रहकांच्या 'समाधाना'ची बेरीज जास्तीत जास्त होईल अशा तऱ्हेने वाटप करण्याचं हे तत्त्वज्ञान. आता या समाधानाची मोजणी आणि बेरीज कशी करायची? कारण व्यक्तीव्यक्तीच्या समाधानाचा अनुभव वेगळा, मात्रा वेगळी. त्यांची तुलना आणि बेरीज कशी करणार? भुकेचे ठोस मोजमाप करता येणार असेल तर ती शमविण्याच्या समाधानाचे करता येईल.
 बंगालमध्ये पडलेल्या भीषण दुष्काळात माणसं गावं सोडून कलकत्त्यात आली. अगदी धान्याच्या गोदामांजवळ येऊन उपासनं मेली. पण त्यांनी गोदामे फोडण्याचा प्रयत्न केला नाही. या भुकेचं मोजमाप कशानं करायचं? उलट,

माझ्या शेतकरी भावांनो मायबहिणींनो / ११३