पान:माझे सांगाती (Maze sangati).pdf/97

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

ग्राहकांना भरपूर सहन केलं. ग्राहक, वृत्तपत्रे इत्यादींबद्दल तो खासगीत बरंच नि खरं बोलत राहायचा. त्याचं प्रत्येकाशी भांडण असायचं. या भांडणाच्या मुळाशी एक भांडण मोठं होतं. त्यानं स्वत:च स्वत:शी केलेलं. त्यामुळे तो सतत अस्वस्थ आत्म्यासारखा असायचा. बेचैनी हे त्याचं रक्त होतं, वृत्ती होती.
 जाहिरात हा त्याच्या पोटापाण्याचा व्यवसाय होता खरा; पण कविता, साहित्य, संगीत, नाटक, अभिनय ही त्याच्या स्वैर मुशाफिरीची क्षेत्रं होती. साहित्यातील कोणत्याच अंगणाचं त्याला वावडं नव्हतं. मराठी, इंग्रजी, विशेष वाचायचा. वाचन इतकं प्रगल्भ की त्याचा प्राध्यापकी, दिखाऊ खळाळ कधी कुणी ऐकला तर कळवावा. ललित लेखन त्यांची मिरासदारी होती. पाऊस, फुलं, रस्ते, इत्यादींवरचं त्याचं ललित लेखन मराठी सारस्वतातील नजराणे ठरावेत. तो स्वत:साठी लिहायचा. त्याचं सारं जीवन ‘स्वान्त सुखाय' होतं की नाही माहीत नाही; पण ते आत्मरत खचीतच होतं. खरा सुनील कुणालाच कळला नाही.
 तो लग्नाला टाळाटाळ करायचा. मानगुटीवर बसून त्याचे आप्तांनी लग्न केलं. मग लग्नच त्याच्या मानगुटीवर बसलं. परत ब्रह्मचाच्यासारखा काही काळ तो सरलष्कर पार्कमधल्या फ्लॅटमध्ये राहत होता. तेव्हाची एक संध्याकाळ मला आठवते. त्या संध्याकाळी भाऊ, आई, बाबा, आप्त, भागीदार, पत्नी अशी न लिहिलेली कितीतरी खाती त्यानं उलगडून दाखवली नि मग मला सुनील थोडा उमजला.
 त्याला संगीताची आवड नि जाण होती. अशा कार्यक्रमातील त्याची हटकून असणारी उपस्थिती दर्दी असायची. कार्यक्रम झाल्यावर एखाद्या शब्द, वाक्यातील त्याची दाद भावगंध असायची. नाटक, अभिनयाचं काय सांगावं? अभिनयाचं रौप्यपदक मिळविलेला सुनील, त्याचा रंगवलेला चेहरा मात्र मला चुकलाच. दोनदा आग्रही निमंत्रणांनंतरही!

 जयेंद्रच्या दारातील होर्डिंग अख्ख्या कोल्हापूरचं मनोगत असायचं. कोल्हापूरचं पाणी प्यायचं कोणी?' म्हणून केलेला प्रश्न महानगरपालिकेस चांगलाच झोंबला होता. त्या वेळी काही अधिकारी त्याला दटावते झाले. मग सारं निवळलं. पाणी मात्र अजून गढूळच. स्टेशन रोडवरील जीवघेणी वाहतूक पाहून एकदा त्यानं लिहिलं, 'स्टेशन रोड सुरक्षित ओलांडल्याबद्दल अभिनंदन! त्याचं हे होर्डिंग प्रत्येकाच्या मनातील गुपित असायचं. गणेशोत्सवातील धांगडधिंगा पाहून त्यानं लिहिलं होतं, ‘गणपतीला हळू आवाज आवडतो. जिल्हाधिकारी

माझे सांगाती/९६