पान:माझे सांगाती (Maze sangati).pdf/96

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

येऊन पायरीवर बसून ओक्साबोक्शी रडलेले त्याचे वडील, पित्याचं ते अपयशी आक्रंदन, पिळवटणारं होतं.
 पुढं सुनील ऑक्टोबरला बसला नि बोर्डात आला. बोर्डात येणारा तो ‘आंतरभारती'चा पहिलाच विद्यार्थी. तो डॉक्टर, इंजिनिअर होणार हे गृहीत. नंतर एकदा मी त्याला विनायक स्टॉपवर पाहिलं. 'कुठं? विचारताना राजाराम कॉलेजवर अॅडमिशन घेतलं म्हणाला. “काय करतोस? ‘बी. ए.' त्याचं उत्तर सहज होतं; पण त्यात सहजता नव्हती. घरचे प्रश्न होते. त्यामागे सुनीलला प्रश्न पचवायची, पेलायची नि लपवायचीही सवय जुनीच म्हणावी लागेल. खरा सुनील त्या दिवसापासून मला समजू लागला.
 काही दिवसांनी तो चक्क काळा डगला घालून कोर्टात जाताना दिसला. 'हे रे काय?' म्हणताना, ‘वकिली जमते का बघू' म्हणाला. ती जमणारं रसायन त्याच्यात नव्हतंच मुळी! पुढं तेच झालं. त्यानं काळा कोट उतरवला.
 चकवा नि सुनीलची घट्ट मैत्री, मी त्याच्या लहानपणापासून अनुभवत आलोय. सुनीलबद्दलच्या माझ्या गृहितांना तो नेहमी चकवतच आलाय! चकवा त्याची वृत्ती नाही. परिस्थितीनं प्रत्येक वेळी त्याला चकवलं, दुखवलं, साठमारी केली. परिस्थितीनं त्याची हरघडी, हरक्षणी, शेवटच्या क्षणी तर चक्क तो वाटमारीचाच बळी ठरला...
 प्रसिद्धीच्या झोतात सुनील मला कधीच दिसला नाही. आंधारवेड होतं त्याच्यात. भूमिगत होऊन पुरुषार्थ एंजॉय करणारा सुनील खुललेल्या कळीसारखा आनंदी असायचा. दडलेलं रत्न असलेला सुनील नंतर ‘जयेंद्र'मध्ये बसू लागला. वडील रिटायर्ड मूडमध्ये जे कृष्णमूर्ती झालेले नि सुनील बाबांचं सारं उपसत होता. मोठी दमछाक व्हायची त्याची त्या काळात, घुसमटही मोठी असायची. व्यक्तिगत आयुष्याबद्दल मितभाषी असलेला सुनील सामाजिक जीवनाबद्दल मात्र परखड होता.
 जयेंद्र पब्लिसिटीची कल्पक जाहिरातदार म्हणून ख्याती होती. माधवराव धोपेश्वरकरांनी ती ख्याती रुजवली, जोपासली. सुनीलला ही परंपरा जपायचं आवाहन, आव्हान देत राहायची.

 व्यवसायातील अवैध स्पर्धेबद्दल सुनील नाराज असायचा. आपले वैध मार्ग कुचकामी ठरतात म्हणून तो अस्तित्वाची लढाई रोज नव्या मार्गांनी, नव्या शस्त्रांनी करीत राहायचा. या लढाईनं त्याला कधी नेत्रदीपक यश जरी दिलं नाही तरी तो लढाईत अस्तित्व टिकवून राहिला. मनुष्यसंग्रह हे त्याचं बळ होतं. सौजन्य हा त्याचा शिष्टाचार होता. 'ग्राहक देवो भव' नावाखाली त्यांनी

माझे सांगाती/९५