पान:माझे सांगाती (Maze sangati).pdf/89

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 नाशिकच्या माझ्या आकर्षण असण्याच्या अनेक कारणांत मुक्तेश्वर हे एक नाव होते. त्यांचं संघटनकौशल्य, सर्व संस्थांतील संसार, सारं करायचं नि नामानिराळे राहायचं. त्यांच्या या ‘लो प्रोफाईल' जगण्याची माझ्यावर विलक्षण । मोहिनी. नाशिकच्या मातीचा तो महिमा असावा. माझे नाशिकमधील कितीतरी सहकारी मित्र असेच. ‘आधाराश्रमा'चे नाना उपाध्ये, ‘सकाळ'चे उत्तम कांबळे, कवी राम पाठक, आमचे आयुक्त राहुल अस्थाना या सा-यांवर कुसुमाग्रजांच्या ‘लो प्रोफाईल'ची विलक्षण मोहिनी. विलक्षण प्रभाव! मुक्तेश्वर मला जवळचे वाटण्याचे आणखी एक कारण म्हणजे सेवादल, ‘आंतरभारती'चे संस्कार. मी याच मुशीत घडलेला. मी त्यांच्यात एक खास ‘संस्कारबंधुत्व' अनुभवत आलोय.
 कुणी काही विधायक, अनुकरणीय करीत असेल तर मुक्तेश्वर मुक्त हस्ते त्याला साहाय्य करतात. समाजकार्यात हातचं ठेवून कार्य करणं त्यांना कधी जमलंच नाही, किंबहुना ती त्यांची वृत्ती नाही. मध्यंतरी उत्तम कांबळे यांनी कुसुमाग्रजांच्या इच्छेवरून कारागृहातील बंदीजनांच्या कविता संकलित करायचे ठरविले. मुक्तेश्वर त्यांच्यामागे उभे. मुक्तेश्वर हे पडद्याआडचे कलाकार. मिरवणं त्यांना जमत नाही. अन्यथा ते मोठे पुढारी व्हायला हरकत नव्हती; पण त्यांचा पिंड कार्यकत्र्याचा. पुढा-यांचं पेंढारपण हा त्यांना न शोभणारा, भावणारा भाव. त्यामुळेच ते मितभाषी पण मुक्त संचारी मुक्तेश्वर!
 मुक्तेश्वर पोटासाठी सरकारी चाकरीत; पण भाकरीशी प्रतारणा करण्याचा त्यांचा स्वभाव नाही. शासकीय सेवेत नेहमी ते चुकलेल्या कोकरागत वावरत असतात. शासकीय सेवेत आपलेपणाचा अपवाद मुक्तेश्वरांमुळे नेहमीच उठून दिसतो. लोकांना ब-याचदा चुकल्यासारखंही वाटतं. ते ज्या पाटबंधारे विभागात कार्य करतात, तेथील एका वरिष्ठांकडे जाण्याचा प्रसंग नाशिकमधील एका मुक्कामात आलेला. त्या वरिष्ठ अधिका-यांनी मुक्तेश्वरांची मुक्तकंठाने केलेली प्रशंसा म्हणजे एक दुर्मीळ योगायोग.

 मुक्तेश्वर मुनशेट्टीवार मला नेहमीच विचारधारेचं वावडं सोडून जे जे समाजहितैषी असेल ते करणारे सर्ववेळ समाजसेवक, कार्यकर्ते वाटत आलेत. माझ्या लहानपणी ‘सार्वजनिक काका' नावाचं व्यक्तिमत्त्व अभ्यासाला होतं; पण कळत्या वयात मुक्तेश्वरांमुळे ते अभ्यासायला मिळालं. मोठ्यात मोठे व लहानात लहान होणारे मुक्तेश्वर मला नेहमी 'फ्री लान्स पब्लिक अंकल' वाटत आलेत. मुक्तेश्वर कुसुमाग्रजांचे मित्र होते हे पाहिल्यावर, अनुभवल्यावर त्यांचा मनोमन वाटलेला हेवा- मुक्तेश्वरांच्या मोठेपणाचीच पावती नव्हे का ?

माझे सांगाती/८८