पान:माझे सांगाती (Maze sangati).pdf/82

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


उरफोड ते कधी करीत नाहीत. केल्याची छाती फोडण्याचा अविवेकही ते नाही कधी करीत. ‘क्रिया करुनी करवावी। बहुतांकरवी।।' अशी त्यांची कार्यसंस्कृती. ‘आधी केले, मग सांगितले' असंपण नाही. ते करीत राहतात. ‘समझनेवाले को इशारा काफी' असं त्यांचं अव्यक्त सांगणं, शिकवणं असतं. त्यांचे जीवन म्हणजे मौन शिकवणी! वर्तल्याविण बोलावे। ते शब्द मिथ्या।। हे उमजलेलं समर्थ जीवन!
 काकांनी कधी कुणाचा शब्दमत्सर केला नाही की दु:स्वास! अवघेचि सुखी असावे। ऐसी वासना।।' असं मानून जगणारे काका. काकांच्या मनात हे औंदार्य कुठून यावं? मला वाटतं नित्य, नूतन हिंडण्यातून, उदंड देशाटनातून त्यांचं मन असं निष्कपट झालं असावं। विपश्यना, योग, ध्यानधारणा, मनन, चिंतन यांचा तर त्यांनी रियाज केलाच; पण 'मन चंगा तो कठौती में गंगा' हे ओळखणारा हा गंगातीरकर खरा गंगावासी वाटावा असं साधुचरित्र नि म्हणून समर्थ!

 घर बांधल्यानंतर वास्तूला पत्नीचे नाव देणारे काका मला ऊरबडवे समतावादी किंवा भोंगळ समाजवादी कार्यकर्त्यांपेक्षा अबोल आचारधर्म जपणारे समर्थ सज्जनगृहस्थ म्हणून नेहमीच अनुकरणीय वाटत आलेत. मी त्यांच्याशी फार बोललोय, त्यांची माझी फार जवळीक आहे, अशातला भाग नाही. त्यांच्या माझ्यात पिढीचं अंतर असल्यानं ते शक्यही नाही. तरीपण त्यांच्या माझ्यात एक अव्यक्त जवळीक मी नेहमी अनुभवत आलोय! हे सारं होत राहतं रोज क्षण-क्षण जपणाच्या दिव्यामुळं. अशी माणसं फार कमी असतात. भावलेलं जपणारी, जोपासणारी. काका मला आप्त वाटतात ते या भावऋणामुळे. रक्ताच्या नात्यापेक्षा जुळून आलेली - जाणीवेनी जुळलेली नाती, त्यांच्या गाठी पक्क्या असतात म्हणे. देण्याघेण्यापलीकडची नाती खरी. नाही, मी काकांचा कोणीच नाही. तरी मला त्यांच्याबद्दल असं का वाटावं? अचंबाच ना? ही सारी असते समर्थ चरित्राची किमया!

माझे सांगाती/८१