पान:माझे सांगाती (Maze sangati).pdf/81

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


क्रियायां च साधूनान एकरूपता' या उक्तीप्रमाणे यांचे चरित्र साधू नि माणसाच्या समर्थ अद्वैततेचं अपवाद उदाहरण! सारे योग एकाच जन्मी, एकाच कुंडलीत जमून येतात कसे, याचं मला म्हणूनच आश्चर्य!
 माणसं प्रवृत्त वयात क्रियाशील असतात; पण निवृत्त झाली की मात्र निष्क्रिय होतात, आळसावतात हे मी सर्वत्र अनुभवलंय! काकांचं तसं नाही. निवृत्तीनंतरही सर्ववेळ सक्रीय, समाजशील राहिलेलं हे ख-या अर्थाने स्वयंभू, समर्थ चरित्र! उमेदीच्या वयात मेहनतीनं बलदंड केलेलं शरीर उतारवयात त्यांनी आपलं मन निर्विकार ठेवून जपलं. घरात बराचसा स्वावलंबी व्यवहार. सकाळी स्वत:चा चहा, अंघोळ, कपडे धुणं - उतारवयात एकाकी असतानाही स्वतंत्र राहणं. एक कळता मुलगा दगावल्याचे निमित्त होऊन मनोदुर्बल व परावलंबी झालेल्या पत्नीचं सर्वकाही व्रतस्थ वृत्तीने करणारा हा समर्थ सत्यवान! सकाळचं प्राथमिक उरकलं की काकांचा नित्यनियमाचा ‘प्रभात संचार' सुरू होतो. गेली साठ वर्षे त्यांचे सकाळचं फिरणं म्हणजे सैनिकांचे यांत्रिक संचलन नसतं. त्यातही ते गोतावळा जमवतात व ‘प्रभात संचार मंडळ' चालवितात. संध्याकाळी ज्येष्ठांची मांदियाळी जमवितात. वसाहतीचे कार्यकारी मंडळ पूर्ण होतं ते काकांना घेऊनच. तिथे मुख्याध्यापक संघाच्या जेवणावळीची परंपरा चालवून एकोपा ठेवतात. ब्राह्मणो भोजनप्रियः' असं ते नुसतं म्हणत नाही बसत. प्राचीन वचनं ही त्यांचे आचारधर्म बनतात म्हणून ते समर्थ, ‘बहुत जनासी चालवी। नाना मंडळे हालवी।। ऐसी हे समर्थ पदवी' - असा 'दासबोधा'चा प्रत्यय देणारी त्यांची क्रियाशीलता - अनुकरणीय नि म्हणून समर्थ!
 सन्मित्र वसाहतीच्या ‘ज्येष्ठ नागरिक मंडळात सध्या पिता-पुत्र उभय ज्येष्ठ नागरिक म्हणून एकत्र बसतात तेव्हा त्यांच्या आरोग्यसंपन्न जीवनाचा हेवा तर वाटतोच; पण अचंबाही तितकाच. अजूनही सकळ इंद्रियांच्या समर्थ साथीचं जीवन!

 काकांनी प्रपंच सांडून (सोडून) परमार्थ नाही केला. नेटका संसार केला. इतका नेटका की त्यांची नात रूपा ही एकटी अमेरिकेत गेली नि स्थायिक झाली. संसारत्याग न करता, प्रपंच उपाधी न सोडता काकांनी जनामानसातील सार्थकता शोधली. नैराश्यातून येणारं वैराग्य त्यांना कधी शिवलं नाही. ते नित्य मनुष्यमात्रात गुंतून राहतात. 'हेचि माझे पंढरपूर' असा असतो त्यांचा वानप्रस्थ नाना पुराणं वाचतात ते! नाना तीर्थाटणंही केली. चक्क विश्वपर्यटन केलं; पण त्यांच्या काठीच्या टोकालाही पाश्चात्य संस्कृतीचा अहंगंध' (गंड?) लागला नाही. जनाजना लाजवी वृत्ति' असा हा ‘योगेश्वर' समर्थ। ‘आधी कष्ट, मग फळ। कष्ट चि नाही ते निष्फळ।।' हे त्यांच्या जीवनाचे तत्त्वज्ञान, त्यांची

माझे सांगाती/८०