पान:माझे सांगाती (Maze sangati).pdf/80

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

{{gap}]काकांना मी शिक्षक झाल्यापासून ऐकून होतो. प्रायव्हेट हायस्कूलमध्ये प्रशिक्षणार्थी म्हणून जात असताना मी त्यांच्यातील प्रशासक अनुभवला होता. पुढे आणीबाणीच्या काळात मी शिक्षक संघटनेत सक्रिय होतो. तत्कालीन जनसंघ, लाल निशाण, समाजवादी नि काँग्रेसमधील आम्ही काही तरुण शिक्षकांनी एकत्र येऊन एक ‘फ्रंट' तयार करून सत्ताधारी (अनेक वर्षे संस्थाचालकांचे मांडलिक बनून संघटना चालविणा-या) नेतृत्वाविरुद्ध बंड केलं होतं. त्या वेळी आम्हाला बैठकांना जागा मिळणं मुश्किल होतं! काका ते द्यायचा उदारपणा दाखवायचे असं आठवतं! पुढे मी अनेक संस्थांच्या कायद्याच्या निमित्तानं त्यांचा हा देकार अनुभवलेला! १९८0 ला अनपेक्षितपणे त्यांच्या सन्मित्र वसाहतीतील घरासमोर भाड्याने राहू लागलो.
 काकांचे चिरंजीव प्रा. बाळासाहेब गंगातीरकर हे माझे महाविद्यालयातील प्राध्यापक, काकांचीच सोज्ज्वळता घेऊन आलेले आमचे सर काकांचे खरे ‘वारसपुत्र.' काकांच्या सूनबाई व आमच्या सरांच्या पत्नी प्रा. हेमा गंगातीरकर (पूर्वाश्रमीच्या मुंगळे) आमच्या महाविद्यालयातील वरिष्ठ सहाध्यायी. यांची नि माझी मुलं एक वारगीची. असा तीन पिढ्यांचा ऋणानुबंध असा जमून आला की ते केवळ शेजारी न राहता आप्त, स्वकीय, साथी, संगी, सल्लागार, मार्गदर्शक केव्हा बनले समजलेच नाही. या निकट सहवासात त्यांच्या चारित्र्याच्या समर्थ गाठी आपसूक उकलत गेल्या...

{{gap}]काका उपजत बुद्धिमान. लहानपणी ‘शिष्यवृत्ती मिळालेल्या काकांनी जाणतेपणी उत्तम ‘शिष्य संस्कृती निर्माण केली. संस्कृत, इंग्रजीसारख्या कठीण विषयांचं त्यांनी केलेलं समर्थ अध्यापन म्हणजे ‘सारस्वत साधना'. शिक्षकाबरोबरच काकांच्यात कार्यकर्त्यांचा पिंड बलवत्तर. कळत्या वयात ते संघाचे कार्यकर्ते होते; पण संघीय कर्मठता त्यांच्यात कधी दिसली नाही. ब्राह्मणी अलिप्तताही त्यांना कधी शिवली नाही. त्यामुळेच ते समाजशील राहिले व संघटकही. सचिव म्हणून प्रायव्हेट एज्युकेशन सोसायटीची धुरा सांभाळताना त्या संस्थेने आपले वैभवाचे - परम वैभवाचे दिवस पाहिले. मुख्याध्यापक असताना तर त्यांना आपल्या हायस्कूलचा ‘अमृतमहोत्सव अनुभवता आला. काकांचं समग्र आयुष्य हे अनेक वरदान घेऊन आलेलं आयुष्य! व्यक्तिगत व सामाजिक जीवनातील सारे रौप्य, सुवर्ण, अमृत, सहस्रचंद्रदर्शन नि आता ‘नाबाद नव्वदी' उत्सव त्यांनी 'याचि देही, याची डोळा' डोळे भरून अनुभवले. ते शतायुषी झाले व त्यांच्या जिवंतपणी त्यांची जन्मशताब्दी साजरी झाली तरी मला आश्चर्य वाटणार नाही ते अशाकरिता की हा माणूस आतून-बाहेरून समाधानी, सात्त्विक नि म्हणून समर्थ। ‘चित्ते, वाचि,

माझे सांगाती/७९