पान:माझे सांगाती (Maze sangati).pdf/8

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

‘अमर' केलं. वसंतराव घाटगे उद्योगपती; पण रोटरी क्लबच्या माध्यमातून त्यांनी रिमांड होमचा पाया घातला. आज बालकल्याण संकुलाच्या रूपात त्याचा वटवृक्ष होतो, हे त्यांच्या शताब्दीचे खरे सार्थक, गुरुवर्य दि. ग. गंगातीरकर हे आयुष्यभर एका शिक्षण संस्थेस ऊर्जित रूप यावं म्हणून चंदनाप्रमाणे झिजले. लक्ष्मीकांत देशमुख, प्रशासक हा संवेदनशील व समाजहितलक्ष्यी असू शकतो, हे त्यांनी कार्य करून दाखविले. आपल्या घरी अनाथ मुलीचं लग्न करणे याला मन मोठं लागतं. शिवाय परदुःख सहिष्णुताही माणसात असावी लागते. अधिकाराचा विधायक वापर करण्याचा द्रष्टेपणा तुमच्यात असेल तर तुम्ही जग जिंकू शकता. मग ते बदलणे सोपे होऊन जाते.
 सदर संग्रहात काही अप्रकाशित लेख समाविष्ट केले आहेत. काही माणसे महोत्सव, सोहळे, गौरवग्रंथ इत्यादी उपक्रमांपासून दूर असतात. अलीकडच्या काळात स्वप्रकाशित साहित्य जसे वाढते आहे, तसे स्वप्रायोजित महोत्सव, सोहळेही. ज्याची त्याची आवड, वृत्ती म्हणून अशा उपक्रमांकडे पाहिले पाहिजे. काहींवर अभिनंदनाचा, प्रसिद्धीचा वर्षाव वा प्रकाश पडत नाही, म्हणून ती माणसं छोटी ठरत नाहीत. जैन ठिबक'चे भवरलाल जैन, बार्शीभूषण डॉ. बी. वाय. यादव, मुद्रक सतीश पाध्ये, दलितसेवी डॉ. विजय करंडे यांच्याप्रती मी लिहिता झालो ते केवळ सामाजिक कृतज्ञतेपोटी नसून त्यामागे कर्तव्यभावही आहे. मी शांताराम कृष्णाजीपंत वालावलकर नामक धनाढ्य परंतु दानशूर असलेल्या व्यक्तींच्या सहवासात होतो. कुबेर आणि कर्ण एकाच जागी नांदतात का? एकाच ठायी असतात का? असे मला जर कोणी विचारता होईल, तर माझे उत्तर 'होय' असेल. त्यांच्याप्रमाणेच भवरलाल जैन होते. डॉक्टर बिनपैशाची सेवा करतो हे पाहायला ‘आनंदवन'च का शोधायचे? आपल्या आसपासही डॉ. बी. वाय. यादव, डॉ. विजय करंडे असतातच ना! प्रसिद्ध न होता माणसं मोठी असू शकतात; किंबहुना प्रसिद्धिपराङ्मुखच खरे मोठे. समाजाने त्यांचे अनुसरण केले पाहिजे. गर्दी दिसली की उमाळा येणे, पाझर फुटणे यात अभिनय, अभिनिवेश मोठा असू शकतो. न प्रकटता तुमच्यात नित्य पाझरणारा सहज झरा आहे का? तिथे नदीची संभावना मोठी. पैसे नसले तरी मला जितका शक्य आहे तितका उपचार करून मी आजचे मरण उद्यावर ढकलू शकतो, हा दिलासा गरिबाला जीवनदानच असते. ‘जो देगा उसका भला, न देगा उसका भी' अशी फकिरी परोपकारी वृत्ती अपवाद सभ्य माणसात