पान:माझे सांगाती (Maze sangati).pdf/79

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

समर्थ चरित्र : दि. ग. गंगातीरकर

 मला काही माणसांच्या जीवनाचा मोठा अचंबा वाटत आला आहे. असं असतंच कसं मुळी सारं एकत्र? नावात पूर्ण पावित्र्य भरलेलं - दिगंबर गणेश गंगातीरकर, सारं ऐश्वर्य लोळण घालण्याची शक्यता असताना हा लक्ष्मीपुत्र सावकारीचा पिढीजात धंदा सोडून गणेश प्रासादिक सरस्वतीचा आजन्म उपासक होतो. गंगातीरीच्या ध्यानस्थ योग्याप्रमाणे सदैव कर्मशील राहतो. याचं सारं जीवन व कार्य म्हणजे समर्थ चरित्राचा उत्तम नमुना. दासबोधात समर्थ रामदासांनी आत्मप्रकाशी काही श्लोक लिहिलेत. त्यांत एके ठिकाणी ते म्हणतात, “जितुके काही उत्तम गुण। ते समर्थाचे लक्षण।।'
{{gap}]गंगातीरकर काका मला नेहमी ‘समर्थ चरित्र' वाटत आले आहेत. त्यांना मी गेली तीस वर्षे ओळखतो. पण शेजारी, आत्मीय, आप्त म्हणून गेली वीस वर्षे अगदी जवळून त्यांना पाहण्या-अनुभवण्याचा योग आला. 'वयो ज्येष्ठा, मनो युवा' म्हणून मी नेहमीच त्यांच्याकडे एक गूढ' म्हणून पाहत आलो आहे. कुणाला सुखी माणसाचा सदरा (सॉरी- टी शर्ट) हवा असेल तर त्यांनी काकांचा घ्यावा! असं नाही की दु:ख नव्हतंच त्यांच्या जीवनात; पण या माणसाला मी कधी कुरकुरताना ऐकलंच नाही. भौतिक सार्थक्य लाभून हा माणूस कधी मातला नाही. काय अजब रसायन घेऊन आलाय हा माणूस! गृहस्थ असून योगी, संपन्न असून साधा, बुद्धिमान असून निरहंकारी, समर्थ असून नम्र, ‘कॉलनी कल्चर'मध्येही समाजशील - म्हणून तर ‘समर्थ ।।


माझे सांगाती/७८